उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर मुख्यमंत्री शिंदेंचा एका वाक्यात पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 07:27 PM2023-02-08T19:27:45+5:302023-02-08T19:28:17+5:30
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे
रायगड - शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आपली बाजू मांडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आता, उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिलंय.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पक्ष सदस्यत्वाचे आमचे गठ्ठे बघितल्यानंतर त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे सर्वात आधी १६ जणांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर निकाल द्यावा अशी आमची मागणी आहे. कायदे तज्त्रांच्या मते त्या १६ सदस्यांच्या अपात्रेची शक्यताच जास्त आहे, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिंदे गटाकडूनही त्यांच्यावर पलटवार करण्यात येत आहे. अगोदर राहुल शेवाळे आणि दिपक केसरकर यांनी पलटवार केला आहे. आता, स्वत: मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात टीकास्त्र सोडले.
पत्रकारांशी संवाद https://t.co/mOzzvYkRCc
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 8, 2023
आम्ही न्यायप्रिय लोक आहोत, सर्वोच न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. लोकशाहीत राज्यघटना, कायदा आणि नियम आहेत. कायदा, नियमांचे पालन करणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना, आमदारांची बडतर्फी आणि धनुष्यबाण यावरील वादावर दिले. तसेच, काही लोक सुप्रीम कोर्टाला मार्गदर्शन करायला, सल्ले द्यायला लागले तर, मी त्यावर काय बोलु शकतो, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर एका वाक्यात पलटवार केला.
शिवसेनेत निवडणूक झालीच नाही, असेल तर पुरावे द्यावेत
२०१३ नंतर शिवसेनेच्या घटनेत बदल करण्यात आला, त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेवर आक्षेप घेतला. उद्धव ठाकरेंनी सांगितलेली शिवसेनेची घटना पूर्णपणे चुकीची असल्याचा पलटवार राहुल शेवाळेंनी केला. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार ठाकरेंची नेमणूक झाली तर त्याची माहिती द्यावी. शिवसेनेतील इतर पदे कशी भरली याचीही माहिती द्यावी. विभाग, गटप्रमुख ही पदे भरताना कुठे जाहिराती दिली, किती अर्ज आले हेही दाखवावे, असे आव्हान राहुल शेवाळेंनी उद्धव ठाकरेंना दिले.