''पूरग्रस्तांना मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने तर शरद पवार प्रत्यक्ष भेटले''
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:38 AM2019-09-20T00:38:38+5:302019-09-20T00:53:24+5:30
मुख्यमंत्री ज्या वेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्या वेळी हेलिकॉप्टरमधून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करीत होते,
नागोठणे/म्हसळा/धाटाव : मुख्यमंत्री ज्या वेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्या वेळी हेलिकॉप्टरमधून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करीत होते, त्या वेळी मात्र ७९ वर्षांचे शरद पवार मात्र प्रत्यक्ष दुष्काळग्रस्तांना प्रत्यक्ष भेटून त्यांची विचारपूस करीत होते, असे प्रतिपादन खा. अमोल कोल्हे यांनी के ले.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा रायगडमध्ये दाखल झाली असून गुरुवारी सायंकाळी म्हसळा शहरात पोहोचली, त्या वेळी खा. कोल्हे बोलत होते. आमच्या यात्रेचे महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत झाले असून, आज रायगड जिल्ह्यात सर्वच ठिकाणी न भूतो न भविष्यती, असे स्वागत झाले आहे व त्याने मी अक्षरश: भारावून गेलो आहे, अशी भावना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी श्रीवर्धन येथील वाकण नाक्यावर शिवस्वराज्य यात्रा आल्यावर व्यक्त केली.
या वेळी पेण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शिवराम शिंदे, रोहे पंचायत समितीचे माजी सभापती तथा नागोठणे विभागीय अध्यक्ष सदानंद गायकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. रायगडचे खासदार सुनील तटकरे, पेणचे शेकापचे आमदार धैर्यशील पाटील, आ. अनिकेत तटकरे, राजिपच्या अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रवादीचे रोहे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, मधुकर पाटील, शिवराम शिंदे, सदानंद गायकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला रोहे तालुका अध्यक्षा अमिता शिंदे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, रोहा तालुक्यातील कोलाड येथे आंबेवाडी-वरसगाव नाक्यावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिवस्वराज्य यात्रेचे आगमन होताच राष्ट्रवादी व शेकापच्या आघाडीतर्फे ढोल ताशाच्या व फटाक्यांच्या आतशबाजीने स्वागत करण्यात आले.