चिखली आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेचा १० गावांना फटका, रुग्णवाहिकेसाठी जागा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 03:39 AM2019-06-23T03:39:57+5:302019-06-23T03:40:17+5:30
अलिबाग तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे.
अलिबाग - तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी खर्च करूनसुद्धा चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था जैसे थे आहे. आरोग्य केंद्राचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे येथे दहा गावांतील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहे. आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका आहे. मात्र, जागेअभावी आरोग्य केंद्रापासून आठ कि.मी. अंतरावर ठेवावी लागत असल्याने रुग्णांना तत्काळ सेवेसाठी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होण्यास अडचण होत आहे.
कुसुबळे, कुर्डुस, हेमनगर, काचळी, भोमोली, सांबरी, पिटकिरी, कातळपाडा, डभेवाडी, वाघवीरा या परिसरातील जवळपास हजारोच्या आसपास लोकसंख्या चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य सेवेचा लाभ घेतात. या आरोग्य केंद्रामध्ये २४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्य आरोग्यकेंद्र हे तत्काळ सेवेसाठी २४ तास उपलब्ध असावे, असा नियम आहे; परंतु चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातून सायंकाळी ५ वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारची सेवा मिळत नसल्याचे येथील नागरिकांची ओरड आहे. सध्या पावसाच्या कालावधीत सर्पदंश, विंचूदंश, महिलांच्या प्रसूती व लहान मुले यांच्यासाठी येथील नागरिकांना रु ग्णवाहिकेच्या अभावी खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. या विभागात आदिवासी लोकसंख्या जास्त असल्याने त्यांना आर्थिक खर्च परवडणारा नाही. आदिवासीवाडी व भोमोली येथील डोंगराळ आदिवासी परिसरातून रात्री उशिरा रुग्णांना उपचारासाठी आरोग्यकेंद्रात आणल्यास ऐनवेळी आरोग्य केंद्र बंद असल्याने रु ग्णांची गैरसोय होते, असे कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिका केणी यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी
बांधकाम विभाग कधी काम पूर्ण करेल हे माहिती नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी थांबत नाहीत, असे उत्तर देऊन जिल्हा आरोग्य अधिकारी यांची जबाबदारी संपत नाही, ते जिल्ह्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे. अन्यथा सरकारी खुर्चींमध्ये नुसते बसून काय उपयोग, असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू आहे. त्यामुळे जवळच एका खोलीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज चालते, त्यामुळे कर्मचारी तेथे थांबत नाहीत. काम कधी पूर्ण होणार हे बांधकाम विभागाचे अधिकारी सांगू शकतात.
- डॉ. सचिन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी
ढासळलेली आरोग्य यंत्रणा सुस्थितीत करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. चार वर्षे होत आली तरी कामे पूर्ण होत नाहीत.
- रसिका केणी, उपसरपंच,
कुसुंबळे ग्रामपंचायत
प्रशासनाकडेयाबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येतात. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नाही. आरोग्यकेंद्र बांधणीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रु ग्णालयाची रु ग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.