पनवेलमध्ये आदिवासीवाडीत कुपोषणामुळे बालिकेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 12:53 AM2019-12-10T00:53:58+5:302019-12-10T00:54:14+5:30
उपजिल्हा रुग्णालयात सुरू होते उपचार
पनवेल : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. याकरिता कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. अंगणवाड्यांच्या माध्यमातून लहान मुलांना पोषक आहार देण्याच्या योजना कार्यान्वित आहेत. मात्र या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना होताना दिसून येत नाही. पनवेल तालुक्यातील वडघर आदिवासी वाडीतील वंदना मनीष पवार (८) या मुलीचा शुक्रवारीकुपोषणाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पनवेलसारख्या शहरी भागापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडघर आदिवासी वाडीतील वंदनाच्या मृत्यूने कुपोषणाची गंभीर बाब समोर आली आहे. वंदनाला घेऊन तिचे पालक शुक्रवारी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात गेले होते. त्यावेळी तिची प्रकृती अतिशय नाजूक होती. रुग्णालयातल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तिचा मृत्यू झाला. वंदनाच्या शरीरात रक्तच नसल्याने उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सना तिला वाचविता आले नाही.
गेल्या दोन महिन्यापासून वंदना आजारी होती. तिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. जवळपास १५ दिवस उपचार घेतल्यावर तिला गेल्या आठवड्यात डिस्चार्ज देण्यात आला. मात्र तब्बेत खालावल्याने शुक्रवारी वंदनाचे वडील मनीष पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
वंदना वडघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसरी इयत्तेत शिकत होती. वडील मनीष पवार हे सिडकोच्या आरोग्य खात्यात घंटा गाडीवर चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना चार मुली व दोन मुले आहेत. पनवेलसारख्या शहरी भागात कुपोषणामुळे बालकांना जीव गमवावा लागतो, म्हणजे आरोग्य विभागाची उदासीनताच म्हणावी लागेल.
पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या आहेत. याठिकाणी कुपोषित बालकांचा संख्या मोठी आहे. मात्र तालुका आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार हे कुपोषण मध्यम स्वरूपाचे आहे. मात्र वंदनाच्या मृत्यूनंतर पनवेल तालुका कुपोषण मुक्तीपासून कोसो दूरच असल्याचे उघड झाले आहे.
कुपोषणाची आकडेवारी नाही
वंदना पवार या बालिकेला कुपोषणाने आपला जीव गमवावा लागला. शहरी भागात कुपोषणाची ही परिस्थिती असेल तर ग्रामीण, आदिवासी भागाचे काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात ग्रामीण, दुर्गम भागातील सर्वच अंगणवाड्यांमधील मुलांची तातडीने आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
पनवेलमध्ये ६६ मध्यम- स्वरूपाचे कुपोषीत रुग्ण
पनवेल तालुक्यात मध्यम स्वरूपाचे ६६ कुपोषित रुग्ण आहेत तर अतिकुपोषित रुग्णांची संख्या शुन्य आहे.कुपोषणावर मात कारण्यासाठी तालुक्यातील अंगणवाड्यांच्या माध्यमातून नियमित पोषण आहार वितरित केले जात असल्याचे त्यांनी नखाते स्पष्ट केले.
- डॉ. सुनील नखाते, तालुका आरोग्य अधिकारी, पनवेल