चाइल्ड हेल्पलाइनला मुहूर्त मिळेना

By admin | Published: August 14, 2016 03:50 AM2016-08-14T03:50:24+5:302016-08-14T03:50:24+5:30

लहान मुलांसाठी ‘चाईल्ड लाईन-१०९८’ ही आपत्कालीन फोन व सत्वर पोहोचणारी (आऊटरीच) सेवा २४ तास कार्यरत आहे. मुलांच्या समस्या सोडविण्याचे काम गतिमानतेने करणे

Child helpline can be found | चाइल्ड हेल्पलाइनला मुहूर्त मिळेना

चाइल्ड हेल्पलाइनला मुहूर्त मिळेना

Next

- जयंत धुळप,  अलिबाग
लहान मुलांसाठी ‘चाईल्ड लाईन-१०९८’ ही आपत्कालीन फोन व सत्वर पोहोचणारी (आऊटरीच) सेवा २४ तास कार्यरत आहे. मुलांच्या समस्या सोडविण्याचे काम गतिमानतेने करणे, मुलांसोबत सुरक्षित, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्याकरीता ‘चाईल्ड लाईन -१०९८’ ही हेल्पलाईन जिल्हास्तरावर स्थानक करण्याचे आदेश सरकारने २००६ मध्येच दिले आहेत. मात्र रायगड जिल्ह्यात या समितीची अद्याप स्थापनाच झाली नसल्याचे उघडकीस आले आहे.
जिल्ह्यात कर्जत आणि खालापूर या दोनच तालुक्यांत अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत बाल अत्याचार, बाललैंगिक अत्याचार व बालकांची पिळवणुकीचे तब्बल ५२ गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रसिध्दी माध्यमात गाजलेले कर्जतमधील चंद्रप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या अनाथालयातील ३२ मुलांवरील लैंगिक शोषण तर रसायनीतील एका खाजगी आश्रमातील ८ मुलांचे लैगिंक शोषणसारखे गंभीर गुन्हे जिल्ह्यात घडले आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा बाल सल्लागार समिती सक्रीय कार्यरत करणे अनिवार्य आहे. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा प्रशासन जागृकता दाखवत नसल्याचे सातत्याने पाठपुरावा करणारे रायगड चाईल्ड लाईनचे समन्वयक तथा कर्जत येथील दिशा केंद्र या संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या पदसिद्ध अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असणे अनिवार्य आहे. चाईल्ड लाईन-१०९८ जिल्हा बाल सल्लागार समितीच्या स्थापनेबाबत चर्चोसाठी वेळ मिळावा, अशी विनंती करणारे लेखीपत्र दिशा केंद्र-रायगड चाईल्ड लाईनचे समन्वयक अशोक जगंले यांनी २ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांना दिले.

जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष पण प्रत्यक्षात समितीच नाही
जिल्हाधिकारी स्वत: पदसिद्ध अध्यक्ष असणाऱ्या चाईल्ड लाईन-१०९८ जिल्हा बाल सल्लागार समितीचे उपाध्यक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक असतात तर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, बाएसएनएलचे महाव्यवस्थापक, सहाय्यक कामागार आयूक्त, जिल्हा शिक्षणाधीकारी (प्राथमिक), बालनिरिक्षण गृह प्रमुख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, एस.टी.विभागाचे परिवहन अधिकारी, रेल्वे स्थानक प्रबंधक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा चाईल्ड लाईन संचालक, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक हे या समितीचे सदस्य असतात.

जिल्हा बाल सल्लागार समितीच्या स्थापनेबाबत चर्चेसाठी वेळ मिळावा, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. मात्र गेल्या पाच महिन्यांत जिल्हाधिकारी यासाठी वेळ देऊ शकलेल्या नाहीत. त्यानंतर शुक्रवारी चाइल्ड लाइन जिल्हा समन्वयक अशोक जंगले, रायगड चाइल्ड लाइन समन्वयक अमोल जाधव यांनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी समिती स्थापन करण्यासाठी आवश्यक प्रक्रीया पूर्ण करणे अपेक्षीत आहे. ती त्यांनी अद्याप केलेली नाही. जंगले यांच्या पाठपुराव्यानंतर शुक्रवारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एस.गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना या बाबतची पूर्तता करुन मंगळवारी फाईल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- किरण पाणबुडे,
उपजिल्हाधिकारी,
सामान्य प्रशासन विभाग

Web Title: Child helpline can be found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.