कोरोना काळात बालविवाह प्रमाण वाढले, माता आणि बाल मृत्यूंमध्ये ३५ टक्क्क्यांनी वाढ - रुपाली चाकणकर
By राजेश भोस्तेकर | Published: September 16, 2022 01:37 PM2022-09-16T13:37:13+5:302022-09-16T13:38:25+5:30
Rupali Chakankar: कोरोना काळात बालविवाह करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कमी वयात मुलींना बाळंतपण सोसावे लागले आहे. त्यामुळे माता आणि बाळ मृत्यू प्रमाण ३५ टक्याने वाढले आहे. ही एक गंभीर बाब आहे. त्याचबरोबर अंधश्रध्देनेही विळखा घातला आहे.
- राजेश भोस्तेकर
अलिबाग - कोरोना काळात बालविवाह करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कमी वयात मुलींना बाळंतपण सोसावे लागले आहे. त्यामुळे माता आणि बाळ मृत्यू प्रमाण ३५ टक्याने वाढले आहे. ही एक गंभीर बाब आहे. त्याचबरोबर अंधश्रध्देनेही विळखा घातला आहे. त्यामुळे बालविवाह रोखणे आणि अंधश्रध्देच्या जोखडातून समाजाला बाहेर काढणे हे उद्दिष्ट असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाषणातून मत व्यक्त केले आहे.
महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे राज्य महिला आयोगा मार्फत जनसुनावणी सुरू आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी बालविवाह, माता आणि बाळ मृत्यू, अंधश्रद्धाबाबत माहिती दिली. महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत जनसुनावणी व शासकीय विभागांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, गौरी छाब्रिया, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर , राजीप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, पोलिस अधीक्षक अशोक दुधे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, विधी प्राधिकरण सचिव अमोल शिंदे हे उपस्थित आहेत.
कोरोना काळात कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे मुलीचे लग्न लावून देण्याचा पायंडा ग्रामीण भागात घातला गेला आहे. त्यामुळे बालविवाह आणि अंधश्रद्धा रोखणे हे आपल्यासमोर उद्दीष्ट असल्याचे रुपाली चाकण कर यांनी म्हटले आहे.