सेंट जोसेफ शाळेविरोधात पालकांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 03:07 AM2018-10-23T03:07:58+5:302018-10-23T03:08:00+5:30
आयसीएसई बोर्डाची मान्यता असलेल्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जात आहे.
कर्जत : आयसीएसई बोर्डाची मान्यता असलेल्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जात आहे. याबाबत पालकांनी मुख्याध्यापक व व्यवस्थापनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असून पालकांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. याविरोधात सर्व पालक एकवटले असून त्यांनी कर्जतमध्ये शनी मंदिर सभागृहात तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते.
सेंट जोसेफ शिक्षक-पालक शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय मोहिते म्हणाले की, शाळेचे मुख्याध्यापक पालकांना अपमानास्पद वागणूक देतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या तक्र ारी सोडवत नाहीत, भरमसाठ फी देऊनही शाळेत चांगले शिक्षक नाहीत, त्यामुळे शैक्षणिकदर्जाही खालावला आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची आहे. तरी सहलीला गेलेल्या पाल्यांबाबत मुख्याध्यापकांनी पालकांना, सहली दरम्यान विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास, ती आमची जबाबदारी नाही, असे मेसेज करून कळवले आहे. त्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पालकांमधून रेश्मा कुमावत म्हणाल्या, पाल्याची शाळेत सुरक्षा नाही, पार्किंग व्यवस्था नाही, बस शाळेच्या आवारात येत नसल्याने बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर यावे लागते, परिणामी कित्येक विद्यार्थी पडतात, तर अपघाताची शक्यता असते. कॉम्प्युटर शिकण्यासाठी मासिक फी घेतात, मात्र विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत. दोन विद्यार्थ्यांना एक कॉम्प्युटर असणे गरजेचे असताना शाळेत फक्त सात कॉम्प्युटर आहेत. शाळेकडून विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अभ्यासक्रम पूर्ण न करताच प्रश्न विचारले जातात, प्रोजेक्ट करायला सांगतात, मात्र ते तपासले जात नाहीत. मासिक नियोजनाबाबत अहवाल दिला जात नसल्याचे सुवर्णा ढवळे या पालकांनी सांगितले. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक केली जात असल्याचा आरोप यावेळी एका पालकाने केला. तर संतोष देशमुख यांनी शाळा प्रशासन, पालक वर्ग व विद्यार्थी यांच्यातील समन्वय कशा प्रकारे असावे याबाबतीत मार्गदर्शन केले. यापुढे सर्वांच्या तक्र ारींचे निवेदन शाळेला व जिल्हा परिषदेकडे पाठविणार असून भविष्यात शालेय व्यवस्थापनाने सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे मत शिक्षक-पालक संघटनेच्या सदस्यांनी केले.