पोलिसांच्या सतर्कतेने वाचले महिलेसह चिमुरड्याचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 12:43 AM2020-09-01T00:43:40+5:302020-09-01T00:44:15+5:30
आत्महत्या करण्यास गेलेल्या एका महिलेला, तिच्या लहान बाळासमवेत प्रसंगावधान दाखवत गस्त घालताना पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्यापासून वाचविले. त्यामुळे महिलेसोबत चिमुरड्या बाळाचे प्राण वाचले आहेत.
पाली : सुधागड येथील आंबा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्यास गेलेल्या एका महिलेला, तिच्या लहान बाळासमवेत प्रसंगावधान दाखवत गस्त घालताना पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्यापासून वाचविले. त्यामुळे महिलेसोबत चिमुरड्या बाळाचे प्राण वाचले आहेत.
रविवार, ३० आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास २४ वर्षीय महिला नयना बाळू वालेकर (रा.वावळोली आदिवासी वाडी) आपल्या दीड वर्षांचा बाळ प्रणय बाळू वालेकर या मुलाला सोबत घेऊन, पाली आंबा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्यास गेली होती. त्या दरम्यान त्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस हवालदार नरेश मोरे यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी प्रसंगावधान बाळगून महिलेला अडविले. तिचे मन परिवर्तन करून तिला आत्महत्या करण्यापासून रोखून सुरक्षितरीत्या पाली पोलीस ठाण्यात आणले.
या महिलेने घरातील कौटुंबिक वादामुळे ती आत्महत्या करीत असल्याचे पोलीस ठाण्यात सांगितले. या महिलेचे पती, सासू, सासरे यांना पाली पोलीस ठाण्यात बोलावून पुढील चौकशी करण्यात येणार असल्याचे पाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी सांगितले, परंतु पोलीस विभागाच्या या सतर्कतेमुळे एका महिलेसोबत लहान बाळाचे प्राण वाचले. त्यामुळे पोलीस विभागाच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरांवरून अभिनंदन होत आहे.