-हणमंत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे हे गत पंचवार्षिक निवडणुकीत घाटाखालील पनवेल व उरण या विधानसभा मतदारसंघांतून पिछाडीवर होते. त्याच वेळी विरोधात असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर व बंडखोर उमेदवार लक्ष्मण जगताप यांना घाटाखाली चांगले मताधिक्य मिळाले. मात्र, पिंपरी, चिंचवड व मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांनी मोठी आघाडी घेत विजय मिळविला होता.
सन २००९ला लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन मावळ लोकसभा मतदारसंघ तयार झाला. मावळ लोकसभेत पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सद्य:स्थितीमध्ये भाजपाकडे तीन, शिवसेनेकडे दोन आणि राष्ट्रवादीकडे कर्जत या मतदारसंघात आमदार आहे.गेल्या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकांत शिवसेनेचे गजानन बाबर व श्रीरंग बारणे विजयी झाले. मात्र, दोन्ही खासदारांना घाटाखाली रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण व कर्जत मतदारसंघांतून कमी मताधिक्य मिळाले आहे. गेल्या वेळी पनवेल व उरण मतदारसंघांतून श्रीरंग बारणे हे ३४ हजारांच्या मतांनी पिछाडीवर होते. मात्र, कर्जत मतदारसंघात त्यांना २८ हजारांची आघाडी मिळाली होती. तसेच, घाटावरील पिंपरी, चिंचवड व मावळ मतदारसंघांतील एक लाख ६२ हजारांच्या मताधिक्याने बारणे यांचा विजय सोपा झाला. त्यांना सर्वाधिक, ६४ हजारांचे मताधिक्य चिंचवड मतदारसंघातून मिळाले होते.
दरम्यान, राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले व शेकापच्या पाठिंब्यावरील अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना घाटाखाली पनवेल व कर्जतमध्ये मतदारसंघातून ३४ हजारांचे मताधिक्य मिळाले. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या पिछाडीवर गेले. राष्ट्रवादीचे नार्वेकर यांना एकाही मतदारसंघात आघाडी मिळाली नव्हती. या निवडणुकीत शिवसेनेचे बारणे व राष्ट्रवादीचे पार्थ पवार रिंगणात आहेत. चिंचवड व पनवेलमध्ये सर्वाधिक मतदार आहेत. आघाडी घेणारा उमेदवार विजयाच्या जवळ जाण्याची शक्यता आहे.श्रीरंग बारणे : गेल्या निवडणुकीत घाटावरील पिंपरी, चिंचवड व मावळ मतदारसंघात मिळालेल्या दीड लाखाहून अधिक मताधिक्याने बारणे विजयी झाले. मात्र, घाटाखाली पनवेल व उरण मतदारसंघांत ते पिछाडीवर होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी घाटाखाली जास्त लक्ष दिले आहे.
पार्थ पवार : गत निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीला ऐनवेळी राहुल नार्वेकर यांना आयात करावे लागले. या वेळी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार रिंगणात असल्याने राष्ट्रवादीतील कार्यकर्ते गटतट बाजूला सारून कामाला लागले आहेत.
लक्ष्मण जगताप : गेल्या निवडणुकीतील उमेदवार व भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांची भूमिका मावळ मतदारसंघात महत्त्वाची मानली जात आहे. दोन दिवसांपूर्वी बारणे व जगताप यांचे मनोमिलन झाले. मात्र, त्यांचे समर्थक व कार्यकर्ते काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.