Chiplun Flood : पाण्यात बुडालेल्या चिपळूणला आज मुख्यमंत्र्यांची भेट, मदत व बचाव कार्याची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 08:51 AM2021-07-25T08:51:35+5:302021-07-25T08:52:08+5:30
Chiplun Flood : मुख्यमंत्री गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे ११ वाजता पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी १२.२० वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील.
मुंबई - राज्यातील पूरदुर्घटनेत आत्तापर्यंत 112 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 1.35 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी महाड येथील दरड कोसळलेल्या घटनास्थळा भेट देऊन पाहणी केली. यावेळी, तेथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यांना धीर दिला. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगत पुनर्वसन करण्याचं आश्वासनही दिलं. त्यानंतर, मुख्यमंत्री आजच चिपळूण दौऱ्यावर आहेत. सकाळी १० वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने चिपळूणसाठी रवाना होत आहेत.
मुख्यमंत्री गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे ११ वाजता पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी १२.२० वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. त्यानंतर ते दुपारी २.४० वाजता अंजनवेलहून हेलिकॉपटरने मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे, चिपळूण येथील नागरिकांसाठी मुख्यमंत्री काय मदतीची घोषणा करतील का, त्यांना कशाप्रकारे धीर देतील, हेच पाहावे लागलं.
तुम्ही स्व:ताला सावरा - मुख्यमंत्री
शनिवारी रायगडमधील तळीये या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. दरडीखाली गाडल्या गेलेल्या ढिगाऱ्यातून आता कोणी जिवंत बाहेर निघण्याची शक्यता राहिलेली नाही. घटनास्थळावर नातेवाइकांचा आक्रोश सुरू होता. त्यांचे सांत्वन करताना मुख्यमंत्र्यांनाही शब्द सुचत नव्हते. “तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भीषण दरडसंकटात सापडलेल्या नागरिकांना धीर दिला.