सिडकोचे जागेवर अतिक्रमण? रांजणपाडा ग्रामस्थांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 12:59 PM2023-05-23T12:59:28+5:302023-05-23T12:59:35+5:30
वीस वर्षांपासून रस्ता रखडला
- वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : खारघरमधील वास्तू विहार ते तळोजाकडे जाणारा मागील रस्ता तब्बल वीस वर्षांपासून रखडला आहे. शहरातील रांजणपाडा गावाजवळील रस्त्याची एक मार्गिका कित्येक वर्षांपासून बंद आहे. या अर्धवट रस्त्यामुळे शेकडो अपघात याठिकाणी घडले आहेत. सिडकोची उदासीनता यामुळे समोर आली आहे. विशेष म्हणजे अतिक्रमणाच्या नावाखाली सिडको कारवाया करीत असताना या रस्त्यावर सिडकोने अतिक्रमण केल्याचा रांजणपाडा ग्रामस्थांचा आरोप आहे.
एकीकडे शहरात रातोरात उभारलेला कोपरा पुलामुळे सिडकोची तत्परता समोर आली आहे. मात्र, शहरात महत्त्वाच्या मार्गांवर वाहनांची मोठी वर्दळ असताना सिडको हा रस्ता बनविण्यास अपयशी ठरली आहे. याच मार्गावर रांजणपाडा गावातील स्मशानभूमी होती. सिडकोने ती जमीनदोस्त केली होती. ग्रामस्थांचा या गोष्टीला विरोध होता. ग्रामस्थ आणि सिडकोच्या वादात महत्त्वाचा वर्दळीचा रस्ता कित्येक वर्षे अर्धवट राहिला आहे. या ठिकाणाहून जाताना वाहन चालकांना विरुद्ध दिशेने वाहनाला वळसा घेऊन पुढे वास्तू विहाराकडे जावे लागत आहे.
सिडकोने हा रस्ता बांधताना संपादन झाली नसलेल्या जागेवरील स्मशानभूमी जबरदस्तीने पाडली. सात गुंठे जागेला पर्यायी जागा देऊन आमच्या गावासाठी नव्याने स्मशानभूमी उभारण्याची मागणी आम्ही करीत असल्याने रांजणपाडा येथील ग्रामस्थ गुरुनाथ चौधरी यांनी सांगितले. मात्र, सिडको असे न करता जबरदस्ती याठिकाणी रस्ता बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या दरम्यान सिडको अधिकाऱ्यांनी धाक दाखवून रस्ता बनविण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी डांबरीकरणासाठी खडी देखील टाकली होती. मात्र, ग्रामस्थ गुरुनाथ चौधरी यांनी उधळून लावला.
अपघातांची मालिका सुरूच
दोन्ही बाजुला डांबरी रस्ता आणि मध्येच खड्डा अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.त्यामुळे वाहन चालकांना रात्रीच्या वेळेला या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होऊन अनेकजण याठिकाणी जखमी झाले आहेत.