झोपडपट्टीवासीयांचा सिडकोवर धडक मोर्चा
By Admin | Published: June 10, 2017 01:17 AM2017-06-10T01:17:38+5:302017-06-10T01:17:38+5:30
झोपड्या, गरजेपोटी बांधलेली घरे, फेरीवाले, धार्मिक स्थळे यांच्यावर सिडको, पालिका, एमआयडीसीकडून होत असलेल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : झोपड्या, गरजेपोटी बांधलेली घरे, फेरीवाले, धार्मिक स्थळे यांच्यावर सिडको, पालिका, एमआयडीसीकडून होत असलेल्या कारवाईमुळे त्रस्त, बेघर झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी पोलीस मुख्यालय आणि सिडकोवर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या माध्यमातून सिडको व्यवस्थापकीय संचालकांना लेखी निवेदन सादर केले.
शासनाच्या आदेशानुसार ३१ डिसेंबर २०१५पूर्वीच्या अनधिकृत घरांना शासनाने अभय दिले असतानासुद्धा त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचा असंतोष मोर्चात सहभागी नागरिकांनी व्यक्त केला. रबाळे पोलीस ठाण्याचे अधिकारी लाठीमार करून सामान बाहेर काढून बेघर करताना, सिडको अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची नाराजीही या वेळी व्यक्त करण्यात आली.
रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून, सिडको व्यवस्थापकीय संचालक आणि पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
३१ डिसेंबर २०१५पर्यंतच्या बांधकामांवर कारवाई न करण्याचे शासनाचे आदेश असतानाही त्याला केराची टोपली दाखवत सिडको प्रशासन पोलिसांच्या मदतीने या बांधकामांवर कारवाई करत असल्याची आणि गोरगरिबांवर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. सिडकोची लॉटरी पद्धत बंद करा आणि सिडकोच्या जागेवर असलेल्या व कारवाई केलेल्या नागरिकांना अल्पदरात घरे उपलब्ध करून द्यावीत, अशीही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया या मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी केली.