सिडकोला प्रकल्पग्रस्त गावांचा पडला विसर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:59 AM2018-12-24T04:59:34+5:302018-12-24T05:01:06+5:30
ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यांतील ९५ गावांच्या जमिनी संपादित करून गब्बर झालेल्या सिडको प्रशासनाला अद्याप प्रकल्पग्रस्त गावांची नावेही व्यवस्थित माहीत नसल्याचे उघड झाले आहे.
- वैभव गायकर
पनवेल : ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यांतील ९५ गावांच्या जमिनी संपादित करून गब्बर झालेल्या सिडको प्रशासनाला अद्याप प्रकल्पग्रस्त गावांची नावेही व्यवस्थित माहीत नसल्याचे उघड झाले आहे. खारकोपर ते नेरुळ या नव्या रेल्वेमार्गावरील गव्हाण गावाचे नाव बदलून सिडकोने ‘गाव्हन’ असा उल्लेख केला आहे. शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोने गावांची नावे चुकविल्यास गावांची ओळख मिटू शकते. विशेष म्हणजे, चुकीचा पायंडादेखील यामुळे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल तालुक्याचे नाव आता जगाच्या नकाशावर पोहोचणार आहे. मोठे मोठे गृहप्रकल्प, मेट्रो, तसेच विविध प्रकल्पांमुळे इथल्या शहरांना नवी ओळख निर्माण होत असली तरी स्थानिकांची अस्मिता त्यांच्या गावांमुळे आजही टिकून आहे. ग्रामपंचायत अस्तित्वात असताना अनेकांनी ओळख टिकवून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला आहे. नवी मुंबई वसविणाऱ्या सिडकोने मात्र गावाच्या चुकीच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिडकोच्या मुख्य अभियंत्यांनी बुधवारी जाहिरात करून प्रस्ताव मागविणारी सूचना प्रसिद्ध केली आहे. तळोजी येथील पॅकेज, खारघर, कळंबोली व पनवेल टर्मिनस, नवी मुंबईतील सानपाडा, जुईनगर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, बामनडोंगरी, खारकोपर फोअरकोर्ट भागातील पॅकेज आदी ठिकाणचे प्रस्तावित गृहप्रकल्प, या गृहप्रकल्पातील प्रस्तावित व्यावसायिक भाग आणि गव्हाण रेल्वेस्थानकातील कॉम्प्लेक्स याकरिता इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, प्लम्बिंग व फायर प्रोटेक्शन आदी सेवा पुरविण्यासाठी संमंत्रकाची म्हणजेच सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या जाहिरातीत गव्हाण गावाचा उल्लेख गाव्हन असा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ४० वर्षे होऊनही सिडकोकडून अशा नावाच्या चुका होणे गंभीर बाब आहे. गव्हाण येथील हजारो शेतकºयांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या आहेत, तशा नोंदी सिडकोकडे असताना ही इतकी गंभीर चूक होतेच कशी, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
गव्हाण गाव हे प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल महापालिकेचे सध्याचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सभागृहनेते परेश ठाकूर, काँग्रेसचे नेते महेंद्र घरत आदीचे गाव आहे. स्थानिकांची ओळख असलेल्या गावाचे नाव सिडकोसारख्या महामंडळाने चुकविणे ही गंभीर बाब असल्याचे मत प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केले आहे.