सिडकोचे लक्ष आता नैना परिसरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 01:00 AM2019-11-08T01:00:40+5:302019-11-08T01:00:49+5:30
नवीन वर्षात विकासकामांना सुरुवात : बेकायदा बांधकामांच्या विरोधात कसली कंबर
नवी मुंबई : तिसरी मुंबई म्हणून सिडकोच्या नैना क्षेत्राकडे पाहिले जाते. या क्षेत्रातील १७५ गांवाच्या विकास आराखड्यालाही मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्यातील २३ गावांच्या विकासाला नवीन वर्षापासून प्रत्यक्षात सुरूवात केली जाणार आहे. त्यामुळे सिडकोने आपले लक्ष आता नैना क्षेत्रावर केंद्रीत केले आहे. याचाच एक भाग म्हणून मागील काही दिवसांपासून या विभागातील अनधिकृत बांधाकामांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने संबधित विभागाने कंबर कसली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील क्षेत्राचा नियोजनबध्द विकास व्हावा, यादृष्टीने शासनाने रायगड जिल्ह्यातील २५६ व ठाणे जिल्ह्यातील १४ अशा २७0 गावांचे सुमारे ५६0 किमी क्षेत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अर्थात नैना क्षेत्र म्हणून अधिसूचित केले आहे. या क्षेत्राच्या नियोजनबध्द विकासासाठी सिडकोची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र दरम्यानच्या काळात या क्षेत्रातील काही गावे नियोजनासाठी एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आली. तर काही गावांचा समावेश पनवेल महापालिकेत करण्यात आला. त्यामुळे नैनाचे क्षेत्र २२४ गावांपुरते मर्यादीत राहिले आहे. यापैकी सिडकोने पहिल्या टप्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश करून विकासाचा पायलट प्रोजेक्ट तयार केला. राज्य शासनाच्या संबधित विभागाने २७ एप्रिल २0१७ रोजी याच्या अंतरिम विकास आराखड्याला मंजुरी दिली. उर्वरित २0१ गावांच्या विकास आराखड्याला सुध्दा १६ सप्टेंबर २0१९ रोजी नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. असे असले तरी दुसऱ्या टप्यातील मूळ २0१ गावांतून ४९ गावे वगळण्यात आली आहेत. खालापूर तालुक्यातील ३५ आणि ठाणे तालुक्यातील १४ अशी वगळण्यात आलेल्या गावांची आकडेवारी आहे. त्यामुळे दुसºया टप्यात आता केवळ १५२ गावे शिल्लक राहिली आहे. पहिल्या टप्यातील २३ आणि दुसºया टप्यातील १५२ अशा एकूण १७५ गावांच्या विकासासाठी सिडकोने कंबर कसली आहे.
नैना क्षेत्राच्या विकासात अनधिकृत बांधकामांचा मोठा अडथळा निर्माण होणार आहे. गेल्या सहा वर्षात या परिसरात मोठ्याप्रमाणात बेकायदा बांधकामे उभारण्यात आली आहे. या बांधकामांना आळा घालण्यास सिडकोच्या संबधित विभागाला अपयश आले आहे. नैनाचे विस्तीर्ण क्षेत्र पाहता अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडे असलेले मनुष्यबळ आणि साधनसामग्री अत्यंत तोटकी असल्याने या विभागाला अपेक्षित प्रभाव टाकता आला नाही. असे असले तरी मागील वर्षापासून या विभागाला अतिरिक्त बळ देण्यात आले आहे. नैना क्षेत्रासाठी स्वतंत्र अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग तैनात करण्यात आला आहे. या विभागाने उपलब्ध साधनसामग्रीच्या बळावर नैना क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
मोहीम तीव्र होणार
बुधवारी नैना क्षेत्रातील .. गावातील एका चार मजली बेकायदा इमारतीवर कारवाई केली. त्यानंतर गुरूवारी पनवेल तालुक्यातील काळोखे, शिरढोण व चिंचवण या गावातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. नैना क्षेत्रातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात येत्या काळात मोहिम अधिक तीव्र करण्याचा निर्णय संबधित विभागाने घेतला आहे.