जिद्दीच्या जोरावर साकारली सिने-कलाकृती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 03:34 AM2018-08-28T03:34:50+5:302018-08-28T03:38:42+5:30
हाड या गावी शशिकांत यांचा जन्म झाला. परिस्थिती अतिशय बिकट असल्याकारणाने उच्च शिक्षण घेता आले नाही. इयत्ता तिसरीमध्ये असताना क्रिकेटमध्ये पहिला क्रमांक पटकावला.
कुलदीप घायवट
रायगड- हाड या गावी शशिकांत यांचा जन्म झाला. परिस्थिती अतिशय बिकट असल्याकारणाने उच्च शिक्षण घेता आले नाही. इयत्ता तिसरीमध्ये असताना क्रिकेटमध्ये पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर, इयत्ता पाचवीमध्ये असताना मराठी एक अंकी नाटकामधूनदेखील पहिला क्रमांक पटकावला व नटराजाची मूर्ती बक्षीस म्हणून मिळाली. त्यानंतर, या क्षेत्रात आवड निर्माण झाली आणि या आवडीमुळेच छोटी-मोठी नाटके लिहीत गेलो. कविता लिहीत गेलो. कलाक्षेत्राची आवड मनामध्ये रुजल्याने प्रत्येक गोष्टीत कला दिसून येत असायची. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे कला क्षेत्रात कसे पुढे जाणचे, याचा मार्ग मिळत नव्हता.
वडील भिकूराम खासगी कंपनीमध्ये काम करत होते. घरचा सर्व कारभार त्यांच्यावर होता. आजोबा रामचंद्र व आई लक्ष्मी हे दोघे शेतात काम करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. मी, बहीण शर्मिला, लहान भाऊ सुधीर आम्ही महाडच्या पिंपळवाडीतील शाळेत शिक्षण घेत होतो. गावामध्ये आई-वडिलांच्या प्रेमाबरोबर गावातील लहान-थोरांचेसुद्धा मला प्रेम मिळाले. वयाच्या पंधराव्या वर्षी मी मुंबईला आलो. मुंबई शहर माझ्यासाठी नवीन होते, पण थोड्याच दिवसांत मी मुंबईला आपलेसे केले. एक दिवस वडिलांसोबत चेंबूरच्या नटराज टॉकीजमध्ये ‘मिलन’ चित्रपट पाहिला. त्यानंतर, अनेक चित्रपट पाहिले. तेव्हापासून कलाक्षेत्रामध्ये काहीतरी करावे असे वाटत होते, पण परिस्थिती हलाखीची असल्याने पुढे काही करता आले नाही. बिकट परिस्थितीतून मार्ग काही सापडत नव्हता. घराची जबाबदारी वाढत होती. तीन मुले त्यांचा सांभाळ, घराचा सांभाळ या गोष्टी करून आपली आवड जपणे चालू ठेवले होते. सिनेमाची कथा तयार होती. मात्र, सिनेमासाठी निर्माते मिळत नव्हते. अनेक नामवंत निर्माते, दिग्दर्शकांसोबत बैठकी झाल्या. कोणी नाक मुरडत होते, तर कोणी हसत होते, तर काहींनी विचार करून सांगू म्हणून टाळाटाळ करत असायचे. या सर्वांच्या नकारामुळे सर्व सोडून घर सांभाळावे, असे वाटत होते. मात्र, नंतर मनातील जिद्दीने पुन्हा उठून उभे केले. स्वत:च चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला. स्वत: लिहिलेल्या चित्रपटावर निर्मिती करत असल्याने, घरांतून सुरुवातीला कसे जमणार, असा विचार करत होते. मात्र, नंतर सर्वांनी पाठिंबा दिला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग कसा होतो आणि तरुणाई कशा प्रकारे बिघडते, यावर भाष्य करणारा चित्रपट आहे. पनवेल येथील आदगी या गावी राम पाटील यांच्या पुढाकाराने शूटिंगसाठी जागा देण्यात आली, तसेच मानखुर्द येथील स्टुडिओमध्ये शूटिंग करण्यात आले. २५ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण चित्रपटात तयार करण्यात आला. या चित्रपटात एकूण ७ गाणी आहेत. अजिंक्य देव, निशीगंधा वाडकर, विजय पाटकर, भाऊ कदम अशा नामवंत कलाकारांनी माझ्या कामाचे कौतुक केले. माझ्या कलेचा आदर केला जात असल्याचे पाहून माझ्यातील जिद्दीत भर पडत गेली. प्रत्येक जण माझ्या मदतीला आला आणि ‘बेजार’ चित्रपटाची निर्मिती झाली. ‘बेजार’च्या टीमने व कलाकारांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले, त्यामुळे उत्तम चित्रपट उभा राहिला.
चित्रपट निर्मिती करणे हे मला स्वप्न वाटत होते. मात्र, माझ्या परिवाराने आणि पत्नी सोनी तांबे हिने मला खूप सहकार्य केले. शशिकांत सावंत, जे. जे. सावंत, पनवेलमधील राम भेईर, मोरेश्वर भोईर, योगेश प्रधान मदतीला धावून आले होते. शूटिंगच्या वेळी माझे मित्र जितेंद्र गुंडकर, उमेश कदम, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण जाधव, पटकथा लिहिणारे शंकर शेगडे आणि सेटवरील सर्व मित्रांनी जबाबदारीने कामे केली, त्यामुळेच चित्रपट बनविता आला.
मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरातील अजिंक्य चाळीत राहणाऱ्या शशिकांत तांबे यांनी चित्रपट लेखन करून स्वत: निर्मिती केली आहे. हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी हे नवे आव्हान स्विकारले. अनेक नामवंत निर्माते दिग्दर्शकांनी चित्रपट निर्मिती करण्यास नकार दिला. त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले. मूळचे महाड येथील राहणारे तांबे सातवी पास आहेत. मात्र, त्यांनी स्वत: हे धाडस केले. स्वत:कडील पैसे एकत्र करून पत्नीच्या नावाने प्रॉडक्शन हाउस तयार केले. या कामासाठी त्यांना घरच्यांचा विशेषत: पत्नीचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे तांबे सांगतात.