मंडल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
By admin | Published: September 28, 2016 02:48 AM2016-09-28T02:48:55+5:302016-09-28T02:48:55+5:30
एका शेतकऱ्याच्या उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना करंजाडीच्या मंडल अधिकाऱ्याला, तो राहत असलेल्या महाड शहरातील फ्लॅटमध्येच
महाड : एका शेतकऱ्याच्या उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना करंजाडीच्या मंडल अधिकाऱ्याला, तो राहत असलेल्या महाड शहरातील फ्लॅटमध्येच अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बालाजी जाधव असे या पकडण्यात आलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. १५ दिवसांपूर्वीच बिरवाडी मंडल अधिकाऱ्याला चार हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शनकडून पकडण्यात आलेले होते. ही घटना ताजी असतानाची १५ दिवसांतच महसूल विभागाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याचे कारनामे पुन्हा उघड झाले आहेत.
महाड तालुक्यात कर्ले येथील जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्याचे नाव त्याच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी बालाजी जाधव यांनी त्या शेतकऱ्याकडे लाच मागितली होती. त्यानंतर त्या शेतकऱ्याने विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. आज दुपारी मंडल अधिकारी राहत असलेल्या शहरातील दस्तुरी नाका येथील सिगल अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून बसलेल्या अॅन्टी करप्शनच्या पथकाने या मंडल अधिकाऱ्याला पकडले.
अॅन्टी करप्शन विभागाचे उपाधीक्षक विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यासिन इनामदार यांनी कारवाई केली.