खोपोली, खालापूरमध्ये मंडळांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:00 PM2019-09-26T23:00:16+5:302019-09-26T23:00:27+5:30
नवरात्रोत्सवाची तयारी; परवानगींसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हेलपाटे
वावोशी : गणपती उत्सवानंतर येणारा सण म्हणजे नवरात्र उत्सव होय. दोन दिवसांवर आलेल्या या सणाची खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मंडळांना परवानगी घेण्यासाठी कर्जत येथे उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात हेलपाटे मारावे लागत असल्याने या वेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
नवरात्र उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने खोपोलीसह खालापुरातील नवरात्र उत्सव मंडळाची तयारी जोरदार सुरू झाली आहे. खोपोली शहरातील नवरात्र उत्सवासाठी जागा, वीजपुरवठा व पोलीस परवानगीसाठी मंडळाचे पदाधिकारी अर्ज करून संबंधित विभागाकडे परवानगी घेण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.
नवरात्र उत्सव हा तरुणाचा उत्सव असल्याने प्रचंड ऊर्जा व विविध पारंपरिक पोशाखाने नटलेल्या तरुण-तरुणी हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असतात. दांडियाची धूम या वेळी पाहावयास मिळते, तर लाइव्ह बेंजो किंवा धडाकेबाज डीजेचा दणदणाट हे या उत्सवाचे दुसरे आकर्षण असते, यासाठीची तयारी प्रत्येक ठिकाणी सुरू झाली आहे. खोपोली शहरात २० नवरात्र मंडळ कार्यरत आहेत, तर खालापूर तालुक्यात २४ मंडळ असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या मंडळांकडून नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.
मागील वर्षापेक्षा या वर्षी देवी मूर्तींच्या किमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली असल्याने पाच फूट उंचीच्या मूर्तीची किंमत आठ ते दहा हजारांवर पोहोचल्याचे दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आकर्षक मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण, हमरापूर येथील मूर्तींच्या कारखान्यात वेगवेगळ्या आकाराच्या व मागणीनुसार मूर्तींची निर्मिती पूर्ण झाली असून, रंगरंगोटी व सजावटीसाठी कारागीर शेवटचा हाथ फिरवीत असल्याचे दृश्य दिसत आहे.