वादळी पावसाचा नांदगावला तडाखा, शेकडो नारळांची झाडे जमीनदोस्त, छप्पर व पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:45 AM2017-10-08T03:45:12+5:302017-10-08T03:45:29+5:30
वादळी वा-यासह शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत प्रचंड नुकसान झाले आहे. नांदगाव तसेच माजगाव या गावांत घराची छप्परे व पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत.
मुरुड / नांदगाव : वादळी वा-यासह शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत प्रचंड नुकसान झाले आहे. नांदगाव तसेच माजगाव या गावांत घराची छप्परे व पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच नारळ व सुपारीच्या बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे.
शुक्र वारी दुपारनंतर सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाºयामुळे परिसरातील शेकडो नारळ व सुपारीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. तर काही झाडे खोडातून तुटून घरांवर, रस्त्यांवर पडली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. नांदगाव भागात नारळ व सुपारीच्या बागायती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे वादळी वाºयाचा मोठा फटका येथे सहन करावा लागला आहे. तीनशेहून अधिक नारळाची झाडे तर सुपारीच्या झाडांची पडझड झाली आहे. नांदगाव येथील रस्त्यावर उभे असलेले वायरमन संजय जाधव यांच्या कारवरही नारळाचे मोठे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. नांदगावातील रहिवासी दीपक खोत यांच्या बागायत जमिनीतील ४० सुपारींची झाडे, तर ३ नारळांची झाडे जोरदार वाºयामुळे उन्मळून पडली आहेत. उपसरपंच जितेंद्र दिवेकर, घोले यांच्या बागायत जमिनीवरील झाडेही पडली आहेत.
फणसाड अभयारण्यालाही जोरदार वाºयाचा फटका सहन करावा लागला आहे. याबाबत माहिती देताना वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी सांगितले की, अभयारण्यातील दोन विजेचे पोल पडल्यामुळे सर्व परिसर अंधारात आहे. अरण्यातील बहुतेक झाडे मधोमध तुटली आहेत. उसरोळी-सुपेगाव रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. नांदगाव येथून मुंबईकडे जाणाºया रस्त्यावरही झाडे पडली होती.
वादळी वारा व पावसामुळे भात पिके पडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. काही शेतकºयांनी कापणी सुरू केल्याने त्यांची तारांबळ उडाली. नांदगाव व आजूबाजूच्या भागात शुक्र वारी ४ वाजता गेलेली वीज शनिवार संध्याकाळपर्यंत आली नव्हती. पाऊस पडल्याने उकाडा आणखी वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नांदगाव परिसरातील वादळी वाºयाचा ताशी वेग हा १२० ते १५० कि.मी. इतका होता. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवेचा वेग वाढला. परतीचा पाऊस असा पडत नाही. वेगवान वारे वाहिल्याने या भागात प्रचंड नुकसान झाल्याचे या वेळी भूगोलातील तज्ज्ञ शिक्षक विजय बनाटे यांनी सांगितले.
संपूर्ण पावसात जेवढे पंचनामे झाले नाहीत, ते एका दिवसात पडलेल्या वादळी वारे व पावसामुळे झाले आहेत. नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील दांडे, नांदगाव, खारीकवाडा, अदाड व वाळवंटी अशा परिसरात घरांचे नुकसान होऊन ३९ लोकांचे पंचनामे करण्यात आले असून, किमान दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाले आहे.
- दिलीप यादव,
नायब तहसीलदार, मुरुड
आठवडाभर जिल्ह्यात कडक ऊन पडले होते. पारा चांगलाच चढला होता. दोन दिवसांपूर्वी भिरा येथे ३६ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. वाढत्या तापमानामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असताना, पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना सुखद गारवा अनुभवला.