आमसभेत नागरिक आक्रमक
By admin | Published: January 8, 2016 02:09 AM2016-01-08T02:09:43+5:302016-01-08T02:09:43+5:30
मागील वर्षाची आमसभा बरखास्त झाली होती. या आधी आठ दहा वर्षे संबंधित आमदारांची आमसभा झालीच नाही. त्यामुळे जनतेचे विविध महत्वाचे प्रश्न
रोहा : मागील वर्षाची आमसभा बरखास्त झाली होती. या आधी आठ दहा वर्षे संबंधित आमदारांची आमसभा झालीच नाही. त्यामुळे जनतेचे विविध महत्वाचे प्रश्न प्रलंबित होते. काही विकासकामे अर्धवट, निकृष्ट होते. याकडे संबंधित तीनही आमदार गांभीर्याने लक्ष देत नव्हते.तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई, निकृष्ट पाणी योजना, खराब रस्ते, वीज प्रश्न यासह मुख्यत: रोहा, वरसेत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली. या सर्वच गंभीर विषयांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंचायत समिती कार्यालयात आमसभा झाली. त्या सभेत तालुका ठिकठिकाणचे नागरिक कमालीचे आक्रमक झाले. प्रचंड गडबड गोंधळ करीत संबंधित सर्वच प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. सभेत पाणी, रस्ते, अनधिकृत बांधकामे, वीज प्रश्नांवर खडाजंगी चर्चा झाली. त्या संबंधित काही अधिकाऱ्यांची नागरिकांना उत्तरे देताना अक्षरश: दमछाक झाली. त्यातच अखेर आ. पंडित पाटील, आ. अवधूत तटकरे मध्ये उठून गेल्याने सभेचे अध्यक्ष आ. धैर्यशील पाटील यांनी सामंजस्यपणे लोक प्रश्नांवर चर्चा घडवून आणली.
रोहा पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी आमसभा वादळी झाली. या सभेला आ. धैर्यशील पाटील, आ. पंडित पाटील, आ. अवधूत तटकरे उपस्थित होते. व्यासपीठावर सभापती लक्ष्मण महाले, तहसिलदार उर्मिला पाटील, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
ठेकेदार व अधिकारी परस्पर कामे ठरवतात. हे यापुढे चालणार नाही, असा सज्जड दम आ. धैर्यशील पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी वीज प्रश्नावर अनेकांनी गदारोळ केला. आमसभेत काही प्रश्नांवर प्रचंड गदारोळ झाला. (वार्ताहर)