मोहोपाडा : जवळपास शंभर वर्षांचे आयुष्य असलेले वडाचे झाड तोडण्यात आल्याने वृक्षप्रेमी नाराज असून त्यांची लेखी तक्रार नोंदवली असूनही वनाधिकारी यांची अरेरावी तक्रारदार यांना सहन करावी लागली आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात ओले केले नाही ना? अशी चर्चा सुरू आहे.चौक तुपगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत नेताजी सहकारी भात गिरणी सोसायटी लिमिटेड आहे. सुमारे साठ वर्षे या गिरणीला झाली आहेत.येथे ग्रामीण भागातील लोक आपले भात भरडाई किंवा विक्रीसाठी येथे बैलगाडीतून घेऊन आल्यावर दिवसभर या वडाच्या झाडाखाली बैल बांधून त्यांना वैरण घातली जायची, जवळपास साठ ते सत्तर फूट परिसरात या वडाच्या झाडाची सावली पसरायची. या झाडाला विस्तीर्ण पार बांधण्यात आला होता. सायंकाळी-सकाळी येथे ज्येष्ठ नागरिक गप्पांच्या आनंदात बसून जीवन कहाणी सांगायचे, असे असताना या झाडाची कोणतीच अडचण नसताना तो का तोडण्यात आला? कुणी तोडला? तो भात गिरणीच्या आवारात होता,मग भात गिरणीच्या व्यवस्थापक यांनी त्याला हरकत का घेतली नाही? त्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले? याची चौकशी होणे आवश्यक आहे!वन विभागाने परवानगी दिली होती का?असे अनेक प्रश्न निर्माण झाले? आहेत.याबाबत तुपगावचे माजी सरपंच शरीफ शेखअली भालदार यांनी व्यवस्थापक भात गिरणी,खालापूर तहसीलदार तसेच तालुका निबंधक सहकारी संस्था यांना निवेदन सादर केले असून वन विभाग खालापूर यांच्या कार्यालयात गायकवाड नामक कर्मचारी-अधिकारी यांनी पत्र स्वीकारण्यास नकार देऊन पत्र स्वीकारून पोहोच देण्यासाठी कर्मचारी नसल्याचे सांगून झाड तोडताना तुम्ही का थांबवले नाही?असा उलट प्रश्न करुन तक्रारदाराची बोळवण केली. यावेळी वन अधिकारी यांचा भ्रमणध्वनी लागत नव्हता.झाड तोडणारे यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल,असे तुपगाव येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव व विजय ठोसर यांच्या सह वृक्षप्रेमींनी सांगितले.
चौक तुपगाव येथील वडाचे झाड तोडल्याने नागरिक संतप्त, वृक्षप्रेमींनी नोंदवली लेखी तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 3:23 AM