नागरिकांची पालिकेवर धडक
By admin | Published: March 30, 2016 01:33 AM2016-03-30T01:33:43+5:302016-03-30T01:33:43+5:30
खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई बौध्दवाडा येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने एक किलोमीटर अंतरावरून पायपीट करीत महिलांना पाणी आणावे लागते
खोपोली : खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई बौध्दवाडा येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने एक किलोमीटर अंतरावरून पायपीट करीत महिलांना पाणी आणावे लागते तर पदपथावरील पेव्हरब्लॉक तुटले असून अनेक वर्षापासून मागणी केल्यानंतरही समाजमंदिराच्या कामाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. सांडपाण्यासाठी गटारे नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. अशा अनेक समस्यांनी ताकई बौध्दवाडीतील नागरिक त्रस्त आहेत अनेकदा पालिकेला विनवण्या केल्यानंतरही पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खोपोली पालिकेवर हंडा मोर्चा काढला होता.
खोपोली नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ताकई बौद्धवाडीतील नागरिकांना अनेक नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत पालिकेकडे अनेकदा विनंती व अर्ज केल्यानंतरही दखलच घेतली जात नसल्याने आक्र मक झालेल्या महिला व ग्रामस्थांनी नगरपालिकेवर धडक दिली. नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ताकई नगरमध्ये असलेल्या सर्व समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नरेंद्र गायकवाड, किशोर पानसरे, श्रीकांत पुरी, ताकई बौध्दवाडीतील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
ताकई नगरमधील रहिवासी आपले प्रश्न घेवून पालिकेत आले होते. या परिसरातील प्रश्न मार्गी लागावेत यासाठी जातीने लक्ष देणार आहे. नागरिकांना मूलभूत सुविधांपासून यापुढे वंचित राहावे लागणार नाही. ग्रामस्थांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न पुढील काही दिवसात सुटतील.
- दत्तात्रेय मसुरकर,
नगराध्यक्ष, खोपोली