मधुकर ठाकूर
उरण : उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या वाढत्या वायुप्रदूषणाचा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून त्याच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. त्रस्त झालेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असताना मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने मंडळाच्या गळथान कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.
उरण परिसरातील जेएनपीए,ओएनजीसी, बीपीसीएल,उरण-पनवेल रस्त्यांवर २४ तास अखंडपणे धडधडणाऱ्या दगडखाणी,क्वाऱ्या व जेएनपीए अंतर्गत असलेल्या रासायनिक प्रकल्पांमुळे याआधीच जल,वायु प्रदुषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या वाढत्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम नागरिकांच्या नव्हे तर पशुपक्षी आणि जीवजंतुंच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या वायुप्रदूषणामुळे नागरिकांना श्र्वसनाच्या आणि इतर व्याधींचा त्रास जाणवू लागला आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याक वाढत्या वायुप्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षच होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.कायम अपयशी ठरत असलेले प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी वायुप्रदुषण नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता घेतील अशी साधारण अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दिवस-रात्रीच्या सुमारास हवेतुन उग्रदर्पाचा वास येत आहे.यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये श्वसनाचे तसेच इतर शारीरिक व्याधी निर्माण होण्याची भीती एका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील दीड वर्षाच्या कालावधीत उरण ओएनजीसीच्या विरोधात वायुप्रदूषणाबाबत नागरिकांकडून एकही तक्रार विभागाकडे प्राप्त झालेली नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी सचिन आडकर यांनी माहिती देताना केला आहे.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर वायुप्रदूषणाबाबत ओएनजीसी प्रकल्पाच्या वरिष्ठांना नागाव ग्रामपंचायतीने सहा दिवसांपूर्वीच पत्र पाठवले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांनी दिली.
प्रदुषणाबाबत विशेष दक्षता घेतली जात असल्याने उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन कोणत्याही प्रकारचे वायुप्रदूषण होत नाही.याबाबत अद्याप तरी तक्रार प्राप्त झाली नसल्याचा दावा उरण ओएनजीसी प्रकल्पाचे मुख्य अधिकारी सुभोजीत बोस यांनी माहिती देताना केला आहे.