जिल्ह्यातील नागरिकांनी पावसाळ्यात काळजी घ्यावी

By Admin | Published: June 28, 2017 03:32 AM2017-06-28T03:32:04+5:302017-06-28T03:32:04+5:30

पावसाळा सुरू झाला आहे. तप्त उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असताना पिण्याच्या पाण्यातून अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.

The citizens of the district should take care during monsoon | जिल्ह्यातील नागरिकांनी पावसाळ्यात काळजी घ्यावी

जिल्ह्यातील नागरिकांनी पावसाळ्यात काळजी घ्यावी

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : पावसाळा सुरू झाला आहे. तप्त उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असताना पिण्याच्या पाण्यातून अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अतिवृष्टी आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींनादेखील प्रसंगी सामोरे जावे लागते. आपत्ती निवारणाकरिता आपत्तीअंती करावयाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण नुकतेच जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांत एनडीआरएफच्या माध्यमातून देण्यात आले आहे. तरीसुद्धा व्यक्तिगत पातळीवर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याने शासन व आपत्ती निवारण यंत्रणा यांच्याकडून विशेष आवाहन जनतेस करण्यात आले आहे.
दूषित पाण्यामुळे अनेक आजारांची शक्यता असते. हे आजार टाळण्यासाठी शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरावे. शेतावर कामाकरिता जाताना घरचे शुद्ध पाणी सोबत घेऊन जावे, शेतातील नाले-ओढ्यांचे वा विहिरीचे पाणी पिऊ नये. गावातील विहिरींचे शुद्धिकरण जलसुरक्षकांकडून नियमित करून घ्यावे. अनोळखी तथा नवीन विहिरीचे पाणी शुद्ध केल्यावर अथवा खात्री झाल्याशिवाय सेवन करू नये. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, उघड्यावर शौचास बसू नये. लहान मुलांनादेखील उघड्यावर शौचास बसवू नये. व्यक्तिगत शौचालय बांधून त्याचा वापर करावा. परिसरात नाले, गटारी, डबकी साचू नये, याबाबत दक्ष राहावे.
आठवड्यात एक कोरडा दिवस पाळावा. सर्व पाणी, पाण्याची सर्व भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून, धुवून, पुसून कोरडी करून ठेवावी. डासांच्या अळ्या पाण्यामध्ये होऊ देऊ नये. सांडपाण्यासाठी शोषखडा व परसबाग निर्माण करावी. उघड्यावरचे अन्न व शिळे अन्न खाऊ नये. दूषित मांस व फळे खाऊ नयेत. आजारी व्यक्ती व लहान मुलांना पाणी उकळून गार करून प्यावयास द्यावे. अतिसार, थंडी, ताप आदी आजारांची साथ आल्यास आशा, नर्स, आरोग्यसेवकांकडून त्वरित उपचार करून घ्यावा. त्याचबरोबर जवळच्या प्राथमिक आरोग्यकेंद्राशी संपर्क साधावा. ग्रामसेवक जलसुरक्षक यांना कळवावे. अतिसाराच्या आजारामध्ये जलशुष्कतेसाठी ओआरएस तथा संजीवनी (साखर, मीठ, पाणी) याचा वापर करावा. ताबडतोब उपचार करून घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे. हाथपंप, विहीर, नळगळती, व्हाल्व लिकेज, परिसर स्वच्छ असावा, विहिरीजवळ भांडी, कपडे, प्राणी धुऊ नये. हगवण, अतिसार, कावीळ आदी साथी असल्यास पिण्याच्या पाण्यामध्ये क्लोरीन, लिक्विड पावडर टाकूनच प्यावे. कुठेही पाणी तुंबून असल्यास ते वाहते करावे. आजारी व्यक्ती व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.
पाऊस व विजेचा कडकडाट चालू असताना, झाडाखाली उभे राहू नये. वीज कडकडाट चालू असताना टीव्ही बंद करावा, मोबाइलवर बोलणे टाळावे, दुचाकी वाहन चालविताना रस्त्यावर, शेडखाली थांबावे, झाडाखाली थांबू नये, गावात पूर, अतिवृष्टी, घरांची पडझड, वीज पडणे, तथा घातक परिस्थिती असल्यास आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचित करावे व सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The citizens of the district should take care during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.