लोकमत न्यूज नेटवर्क म्हसळा : तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात ताम्हणे करंबेवाडी, ताम्हणे करंबे, रातिवणे, कोळवट, भापट अशा सहा गावांचा समावेश आहे. या गावांना दळणवळण करण्यासाठी प्रवासाचे साधन म्हणजे कोळवट रस्ता. तो रस्ता गेली १५ वर्षे नादुरुस्त आहे. अनेक वेळा त्या गावातील ग्रामस्थांची विविध पक्ष, आमदार, खासदार, मंत्री यांना निवेदन देऊन रस्त्यासाठी मागणी केली. वारंवार प्रस्ताव देऊनही कोणीही या रस्त्याकडे गांभीर्याने घेत नसल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.
प्रस्तावांचा ढीग पडला असून आजही हा रस्ता दुर्लक्षित आहे. त्यासाठी कोळवट गाव अंतर्गत सहा गावांनी मुंबई व ग्रामीण ठिकाणी पंचक्रोशी कमिटी स्थापन केली होती. रखडलेला रस्ता पूर्ण करण्यासाठी तत्कालीन सरकार भारतीय जनता पक्ष, शिवसेना, तत्कालीन विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आय, मनसे, अन्य पक्षांतून या रस्त्याचे काम व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. हा रस्ता गेली कित्येक वर्षे दगडमातीचा आहे. परंतु, पंचक्रोशीतील ग्रामस्थ दरवर्षी अंगमेहनत करून रस्त्यावर माती टाकून तात्पुरती अडचण दूर करतात; परंतु हे आणखीन किती वर्षे चालायचे, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. आजपर्यंत अनेक निवडणुका येऊन गेल्या, त्या संबंधित पक्षाने शाब्दिक लेखी आश्वासन दिले, परंतु कोणीही शब्द, आश्वासन आजही पाळले नाही. त्यामुळे आजही त्या रस्त्याची परिस्थिती बिकट झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करायचा म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते.
वास्तविक पाहता भेकऱ्याचा कोंड, ताम्हाणे करंबे, भापट, कोकबलवाडी, रातिवणे, कोळवट ही गावे दुर्गम आणि डोंगराळ असून या गावांतील नागरिकांचे सर्व व्यवहार हे केवळ म्हसळ्यावरच अवलंबून आहेत. शिक्षण, कामधंदा यासाठी नागरिकांना म्हसळ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हा रस्ता प्रामुख्याने होणे गरजेचे आहे. महामंडळाची एसटी बस प्रवास करते, तीदेखील समुद्राच्या तरंगणाऱ्या लाटासारखी करते. काही वेळा महामंडळाची बसदेखील बंद केली जाते. त्यावेळी खासगी वाहनाने प्रवास करायला गेल्यास वाहनचालक प्रत्येक वेळी नाकारतात. त्यासाठी खासगी वाहनचालक दामदुपटीने भाडे घेतात आणि सर्वसामान्य मोलमजुरी करण्याच्या ते आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळे कोळवट रस्ता हा पूर्ण करण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी जातीने लक्ष घालावे अशी ग्रामस्थांनी केली.
ग्रामस्थांची गैरसोयnआम्ही सर्व ग्रामस्थ गेली अनेक वर्षे रस्त्याला कंटाळलो असून जीवन जगणे केवळ रस्त्यामुळे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. निवडणुका आल्या की राजकीय पक्ष या रस्त्याचे आश्वासन देण्यासाठी धावत येत असतात. nपरंतु, बाकी इतर दिवस वगळता रस्त्यावरती कुठला राजकीय नेता फिरकूनदेखील बघत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक पक्षाला प्रस्ताव सादर केला आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.