मुरुडमध्ये वीजप्रवाहात वाढ झाल्याने नागरिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:06 AM2019-07-12T00:06:41+5:302019-07-12T00:06:45+5:30
बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान : वीज मंडळाकडून भरपाईची मागणी
मुरुड : येथील वीज मंडळाच्या अनागोदी कारभारामुळे दरबार रोड परिसरातील असंख्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. बुधवार, १० जुलै रोजी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांच्या अंतरावर या भागातील अचानक वीजप्रवाह वाढल्याने पेटते वीज दिवे आपोआप फुटू लागले. तर आयडीबीआय बँकेचे एक मोठा स्टेपिलायझर, यूपीएस सर्व्हिस रूम जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बँकेचे संगणक, एसी व पंखे आदीचे नुकसान झाल्याने बँकेचे व्यवहार काही काळाकरिता ठप्प झाले होते.
ही बँक वातानुकूलित असल्याने मोठमोठी इलेक्ट्रिक साधने जळाली आहेत. संपूर्ण परिसरात जाळल्याचा वास येत होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत येथील कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठ्याबाबत आम्ही मागील आठ दिवसांपासून वीज मंडळ अधिकारी यांच्या पाठीमागे होतो; परंतु त्यांनी आमची दाद न घेतल्यामुळे आज आमच्या बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. वीजप्रवाह वाढल्यामुळे समुद्रकिनारी असलेल्या हॉटेललाही आर्थिक फटका बसला आहे. या हॉटेलचे आठ बल्ब, एक फ्रिज, तीन पंखे, एक मोठा एलईडी टीव्ही व अन्य इलेक्ट्रिक सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सांगताना हॉटेल गुरुप्रसादचे मालक दामोदर बैले यांनी सांगितले की, ही चूक वीजमंडळाची असून त्यांच्या गैरकारभारामुळे हा वीजप्रवाह अचानक वाढला आहे. आमच्या झालेली नुकसानाची वीजमंडळाने भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी मुरुडमध्ये वीजप्रवाह वाढण्याची ही पहिलीच घटना नसून, याअगोदरही अनेक घटना घडल्या आहेत. वीजप्रवाह वाढल्यामुळे अनेकांचे टीव्ही फ्रिज अशा महागाईच्या वस्तू जळालेल्या आहेत; परंतु ही चूक वीज मंडळाची असूनसुद्धा ग्राहकाला भरपाई दिली जात नाही. वीज मंडळाने ग्राहकाला भरपाई देण्याची तरतूद करावी त्यांच्या कायद्यात तरतूद करा, अशी मागणी करणारे निवेदन अधीक्षक अभियंता पेण व रोहा येथील कार्यकारी अभियंता यांना दिले आहे; परंतु हे लोक भरपाई देण्याबाबत टाळाटाळ करीत आहेत. लवकरच या मागणीसाठी आमचे शिष्टमंडळ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन वीजग्राहकांना भरपाई देण्याबाबत आग्रही मागणी करणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
पावसाळ्यामुळे विद्युतवाहिन्यांवर कार्बन पकडला असावा, तसेच न्यूट्रल फेस न मिळाल्यामुळे अचानकपणे वीजप्रवाहात वाढ झाली. आजच आमच्या सर्व अभियंत्यांनी या ठिकाणची पाहणी केली आहे. घरगुती वस्तू जळाल्या तर नुकसानभरपाई देण्याची तरतूद नाही; परंतु तरीसुद्धा आम्ही पंचनामे करून वीज निरीक्षक यांच्याकडे पाठवून भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- सचिन येरेकर,
उपकार्यकारी अभियंता, वीज मंडळ