विमानतळाला दिबांचे नाव: सत्ताधाऱ्यांविरोधात प्रकल्पग्रस्त ९५ गावातील नागरिक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 07:45 PM2024-01-02T19:45:01+5:302024-01-02T19:45:31+5:30
" देता की जाता", १३ जानेवारी रोजी दिबांच्या जन्मदिनी आंदोलन.
मधुकर ठाकूर, उरण : औरंगाबाद, उस्मानाबाद आणि गोवा विमानतळाचेही नामांतर झाले. मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी फक्त राजकारण करत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकार करीत आहेत. केंद्र व राज्याच्या या कृती विरोधात सरकारला इशारा देण्यासाठी नवीमुंबई, पनवेल,उरण आदी सिडको प्रकल्पग्रस्त ९५ गावातील वारकरी,सांप्रदायिक मंडळ भजन, कीर्तन,प्रवचन करून जनजागृती करणार आहेत.
दिबांच्या जन्मदिनीच १३ जानेवारी रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशव्दारावरच करण्यात येणाऱ्या जनजागृतीमध्ये सत्ताधाऱ्यांना " देता की जाता " असा पाच हजारांहून अधिक दिबाप्रेमी सहभागी होऊन इशाराही देणार आहेत. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकी आधीच नामकरणाचा निर्णय घेण्यात दिरंगाई केल्यास विमानतळाचे काम बंद करण्याचा इरादाही या जनजागृती आंदोलनातून स्पष्ट करण्यात येणार असल्याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील आणि खारघरचे माजी सरपंच विजय शिरढोणकर यांनी संयुक्तपणे माहिती देताना सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने जाणीवपूर्वक दिरंगाई चालविली आहे.महा विकास आघाडीच्या नामकरणाचे
श्रेय लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थापोटी नवीमुंबई विमानतळाला लोकनेते दिबांच्या नावाची घोषणा केली खरी.मात्र केंद्र सरकारकडे नामकरणाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी टाळाटाळ सुरू केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विमानतळाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत नाव देता येत नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मग सरकारने दिबांच्या नावाची घोषणा या आधीच कशी केली आहे.तसेच दिबांच्या नावासाठी विमानतळ होण्यापूर्वीच आंदोलन कशासाठी करण्यात आली होती. अशी विचारणा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील आणि खारघरचे माजी सरपंच विजय शिरढोणकर यांनी केली आहे.
एकीकडे औरंगाबादचे संभाजीनगर, धाराशिवचे उस्मानाबाद असे नामांतर झाले आहे.तर गोवा विमानतळाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.मात्र विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी चालढकल का केला जात आहे.असा सवालही राजेंद्र पाटील, विजय शिरढोणकर यांनी केला आहे.
केंद्र व राज्य सरकार जाणीवपूर्वक विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी चालढकल करीत आहे.
यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे १३ जानेवारी रोजी दिबांच्या जन्मदिनी नवीमुंबई, पनवेल,उरण आदी सिडको प्रकल्पग्रस्त ९५ गावातील वारकरी,सांप्रदायिक मंडळ भजन, कीर्तन, प्रवचन करून केंद्र,राज्य सरकारचा निषेध करुन जनजागृती करणार आहेत.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशव्दारावरच आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनामध्ये सुमारे पाच हजार दिबा प्रेमी नागरीक आणि अनुयायी सहभागी होणार आहेत.लोकसभा निवडणुकीपूर्वी विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे.अन्यथा विमानतळाचे काम बंद पाडण्याचा निर्धारही प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील आणि खारघरचे माजी सरपंच विजय शिरढोणकर यांनी व्यक्त केला आहे.दिबांच्या रक्तरंजीत झेंड्याखाली या जनजागृतीमध्ये सत्ताधाऱ्यांना " देता की जाता " असा इशाराही दिला जाणार आहे.
सत्ताधाऱ्यांनी विमानतळाला दिबांचे नाव देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा याच आंदोलनात ठरविण्यात येणार आहे.यामुळे सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील आणि खारघरचे माजी सरपंच विजय शिरढोणकर यांनी केले आहे.