आगरदांडा : मतदान हा आपला राष्ट्रीय हक्क असून, मतदानाद्वारे आपण लोकशाही मार्गाने आपल्या आवडीचा उमेदवार निवडून त्या व्यक्तीस जनसेवा करण्याची संधी देत असतो. तूर्तास हा बहिष्कार मागे घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी २१ आॅक्टोबर रोजी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा, असे आवाहन मुरुड तहसीलदार गमन गावीत यांनी केले आहे. या भागातील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने त्यांचे मन वळविण्यासाठी तहसीलदारांनी सभा घेऊन नागरिकांची मने वळवण्याचा प्रयत्न के ला.मुरुड नगरपरिषदेने पावसाचे पाणी वाहून नेणारा नाला हा अरुंद व आखूड बांधून पाणी जाण्याचा मार्ग अडवल्यामुळे व उपोषण करूनही नाला न तोडल्यामुळे संतप्त झालेले नेताजी सुभाषचंद्र बोस (शेगवाडा) परिसरातील नागरिकांनी २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या आमदार निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आल्याने मुरुड शहरात खळबळ उडाली होती. प्रशासनाकडून येथील लोकांचे मन वळविण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस (शेगवाडा) परिसरातील नागरिकांची सभा साई मंदिरात संपन्न झाली. या वेळी तहसीलदार गमन गावीत यांनी बहिष्कार मागे घेऊन शासनाच्या कामात मदत करा, आपली नाला तोडण्याची मागणी रास्त आहे; परंतु त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकणे उचित नाही. आपले म्हणणे जसेच्या तसे आम्ही जिहाधिकाऱ्यांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी मुख्याधिकारी अमित पंडित यांनी आपले प्रकरण मला ज्ञात असून आजच्या वेळी आचारसंहिता असल्याने मी कोणताही निर्णय देऊ शकत नाही, तरी येथील नागरिकांनी बहिष्कार मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे सांगितले. या वेळी या सभेत उपस्थित नागरिकांनी जोपर्यंत नगरपरिषद चुकीच्या पद्धतीने बांधलेले बांधकाम तोडत नाही, तोपर्यंत आम्ही आपला निर्णय बदलणार नाही. आमचा हा मतदानावरील बहिष्कार प्रत्येक निवडणुकीत असणार आहे.मुरुड नगरपरिषदेने प्रारंभपत्रकाप्रमाणे काम करणे आवश्यक होते; परंतु मनमानी करून व अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम केल्याने या पावसात आमच्या घरात पाणी शिरले व नुकसान झाले, म्हणून प्रथम नाला तोडण्याचे लेखी आदेश द्या मगच आम्ही आमचा बहिष्कार मागे घेऊ, अशी ठाम भूमिका घेतल्याने कोणताही निर्णय न होता नागरिकांचा बहिष्कार कायम राहिला आहे. या वेळी मंडळ अधिकारी विजय म्हापुस्कर, निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक संतोष पवार आदीसह अधिकारी, पाखाडी अध्यक्ष सुधीर पाटील, उपाध्यक्ष सुनील विरुकुड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्याधिकारी अमित पंडित यांनी आपले प्रकरण मला ज्ञात असून आजच्या वेळी आचारसंहिता असल्याने मी कोणताही निर्णय देऊ शकत नाही. तरी येथील नागरिकांनी बहिष्कार मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे यावेळी नागरिकांशी बोलताना सांगितले.
नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकू नये- तहसीलदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 2:16 AM