पेण : नवरात्रोत्सवाच्या प्रारंभालाच शहरातील विजेचा खेळखंडोबा झाल्यावर पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील व युवक काँग्रेस संघटना व नागरिकांनी आक्रमक होत पेण वीज मंडळावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्याची घोषणा करताच वीज मंडळाचे अधिकारीच नगराध्यक्षाच्या दालनात उपस्थित झाले. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी पेण नगरपालिका सभागृहात बैठक घेतली. यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी भूमिगत योजना कुठे गायब झाली, या नगराध्यक्षांच्या सडतोड प्रश्नांवर येत्या दोन-चार दिवसांत भूमिगत योजनेचे काम सुरू करण्याचे ठोस आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.केंद्र शासनाच्या विशेष निधीतून मंजूर झालेली पेण शहरांची भूमिगत वीज योजना असून, महावितरण कंपनीचे अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून याबाबत चालढकल करीत आहेत. पेण शहरात वारंवार खंडित होणारी वीज, शहरातील इन्फ्रास्ट्रक्चरची झालेली दयनीय अवस्था, अपुरे कर्मचारी, विजेची भरमसाठ वाढीव बिले याबाबत नागरिकांच्या मनात असंतोष खदखदत होता.केंद्र शासनाच्या विशेष निधीतून ७.५० कोटींची योजना थाटामाटात उद्घाटन होऊन वर्ष, दीड वर्षाचा कालावधी उलटूनदेखील कामकाज बंद होते. शहरासाठी पालिकेने न. पा. फंडातून ३४.५० लाखांची हायमास्ट पथदीप योजना कार्यान्वित करून शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकली आहे. शहराच्या प्रमुख पाच चौकांत उजेड राहावा, असा उपदेश आहे. याशिवाय कासार तलाव व अन्य ठिकाणी ५० पोल उभारून एलईडी पथदिवे लावून अधिक उजेडाची व्यवस्था मार्गी लावली आहे. मात्र वीजपुरवठा खंडित होणे, महावितरण कंपनीचा शहराचा इन्फ्रास्ट्रक्चर व विजेच्या खांबावरच्या वीजवाहिन्या जीर्ण व अनेक ठिकाणी स्पार्किंग अशा समस्या असून, याचा काहीही उपयोग होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बऱ्याच भागातले ट्रान्सफॉर्मर जीर्ण अवस्थेत असून, त्यांचे मॉडीफिकेशन झालेले नाही. त्याचबरोबर वीज खंडित होण्याच्या प्रकाराकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. नवरात्री उत्सवात पोलीस यंत्रणेने निर्धारित केलेल्या वेळेत पाच तास वीज गायब झाल्याने अनेक नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांवर पाणी पडले.
वीज मंडळ अधिकाऱ्यांना नागरिकांनी धरले धारेवर
By admin | Published: October 17, 2015 11:40 PM