पेण : ‘स्वच्छ पेण, सुंदर पेण’ या संकल्पनेबरोबरच स्वास्थ्यपूर्ण पेण ही संकल्पना अमलात आणण्यासाठी व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या दृष्टिकोनातून पेण नगरपरिषदेने मॅरेथॉन स्पर्धा घेऊन एक स्तुत्य उपक्रम राबविल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. मिनी मॅरेथॉनच्या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
पेण नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छतेचा संदेश घरोघरी जावा, या उद्देशाने नगरपरिषदेच्या मैदानावर विविध गटातील मुले, मुली, महिला व पुरुषांसाठी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सागर ओक, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील, बांधकाम सभापती राजेश म्हात्रे, पाणीपुरवठा सभापती दर्शन बाफना, महिला ब बालकल्याण सभापती तेजस्विनी नेने आदीसह मान्यवर उपस्थित होते.
आपले जीवन स्वास्थ्यवर्धक व्हावे, यासाठी किमान एक तास तरी व्यायाम करणे गरजेचे असून, यातून निरोगी जीवन जगता येईल. पेण नगरपरिषद ही रायगड जिल्ह्यातील एकमेव नगरपालिका असेल की, ज्यांनी खेळाडूंना भव्य मैदान उपलब्ध करून दिले आहे. खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजी घेतली जात आहे, हे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी अर्चना दिवे, प्रशासन अधिकारी राजाराम नरुटे, सामान्य प्रशासन विभागप्रमुख भरत निंबरे, आरोग्य अधिकारी अंकिता इसाळ, शिवाजी चव्हाण, भांडार विभागप्रमुख आबासाहेब मनाळ, पाणीपुरवठा अधिकारी रमेश देशमुख, कर व शुल्क विभागप्रमुख शेखर अभंग, बांधकाम विभागप्रमुख अमित शेळके आदींनी परिश्रम घेतले. या स्पर्धेत १५०० ते १६०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेतील विजेते
१२ ते १४ वयोगटातील मुले (तीन कि.मी.) - प्रथम महेंद्र जान्या पारधी, द्वितीय अंकित अनिल सकपाळ, तृतीय सोहम रामचंद्र म्हात्रे.१२ ते १४ वयोगटातील मुली (तीन कि.मी.) - प्रथम मयूरी नितीन चव्हाण, द्वितीय मनाली नरेश गुंजावळे, तृतीय परणिता राजेंद्र मोकल.
१५ ते १७ वयोगट मुले (पाच कि.मी.) -प्रथम मिलिंद महादू निरगुडे, द्वितीय मृणाल मनोहर सरोदे, तृतीय हिरामण जोमा गडबळ.१५ ते १७ वयोगट मुली (पाच कि.मी.)- प्रथम प्रतीक्षा प्रदीप कुळये, द्वितीय रोशनी राजेंद्र पाटील, तृतीय भावेश्री रवींद्र पाटील.
१८ ते २० वयोगट मुले (सात कि.मी.)- प्रथम शुभम विकास मढवी, द्वितीय धीरेंद्र बाबुलाल चौधरी, तृतीय शरद लक्ष्मण तांबोळी.१८ ते २० वयोगट मुली (सात कि.मी.) -प्रथम स्वप्नाली बाळकृष्ण म्हात्रे, द्वितीय सायली विष्णुदास पाटील, तृतीय कोमल सुभाष पेरवे.
२१ वर्षांवरील मुले (दहा कि.मी.) - प्रथम करण हरिश्चंद्र माळी, द्वितीय रामू गणपत पारधी, तृतीय दीपक उपेंद्र सिंग.
२१ वर्षांवरील मुली (दहा कि.मी.)- प्रथम ऋतुजा जयवंत सकपाळ, द्वितीय दर्शना दत्तात्रेय पाटील, तृतीय अस्मिता धनाजी पाटील.
५० वर्षांवरील पुरुष (तीन कि.मी.)- प्रथम चंद्रकांत हरी पाटील, द्वितीय कैलास श्रीराम पाटील, तृतीय संदीप गोपाळ मढवी.५० वर्षांवरील महिला (तीन कि.मी.)- प्रथम संध्या नीलेश कडू, द्वितीय सुषमा चंद्रकांत पाटील, तृतीय पद्मावती गजानन पाटील.
ज्या ज्या युवा खेळाडूंनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला, अशा खेळाडूंचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या वेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेण नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रथमच मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवून ही स्पर्धा यशस्वी केली असल्याचे सांगितले. या वेळी डॉ. सागर ओक यांनीही जीवनातील खेळाचे महत्त्व विशद करून आपले स्वास्थ्य कशाप्रकारे सुदृढ राहील, यासाठी क्रीडा कौशल्य जपणे गरजेचे असल्याचे सांगितले.