नागोठणेत दोन गटांत हाणामारी
By Admin | Published: August 16, 2015 11:35 PM2015-08-16T23:35:15+5:302015-08-16T23:35:15+5:30
भरधाव वेगात मोटारसायकलला कट मारल्याच्या पार्श्वभूमीवर दोन गटांत शिवीगाळी व हाणामारी होण्याची घटना शनिवारी रात्री शहरात घडली.
नागोठणे : भरधाव वेगात मोटारसायकलला कट मारल्याच्या पार्श्वभूमीवर दोन गटांत शिवीगाळी व हाणामारी होण्याची घटना शनिवारी रात्री शहरात घडली. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे-पाटील आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि अधिकाऱ्यांनी सूत्रे आपल्या हाती घेत तातडीने तणावावर नियंत्रण आणल्याने परिस्थिती निवळली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून दंगल नियंत्रण कक्षाची तीन पथके येथे तैनात करण्यात आली असून दोन्ही गटांतील एकूण २१ जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील रिलायन्स चौकात शनिवारी मोटारसायकलला कट मारल्याचा राग धरून दोन गटांत शिवीगाळ व मारामारीचा प्रकार घडला होता. आपल्या गटातील तरु णांना मारले आहे याचा राग मनात धरून दुसऱ्या गटातील तरु णांनी पुन्हा एकदा वाद उकरून काढीत भांडणे व हाणामारी केली. याबाबतची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी तेथे येऊन परिस्थितीवर नियंत्रण आणत गुन्हेगारांना ताब्यात घेतले.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे-पाटील आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांनी तातडीने रात्री शांतता समितीची बैठक घेऊन सर्व जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले. रविवारी दुपारी अलिबाग येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. एल. पवार यांनी शहरात येऊन परिस्थितीची माहिती घेतली. तणाव पूर्णपणे निवळला तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून दंगल नियंत्रण कक्षाच्या तीन पथकांसह अलिबाग मुख्यालयासह इतर पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी विविध भागांत तैनात आहेत. दोन्ही गटांतील एकूण २१ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
व्हॉट्सअपवरील अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे-पाटील यांनी दिला आहे.
दंगल नियंत्रण पथक तैनात
खबरदारीची उपाययोजना म्हणून दंगल नियंत्रण कक्षाच्या तीन पथकांसह अलिबाग मुख्यालयासह इतर पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी विविध भागांत तैनात आहेत.
(वार्ताहर)