मधुकर ठाकूर, उरण : तालुक्यातील चिरनेर येथील अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी टाकाऊ वस्तुंपासून आकर्षक रंगीबेरंगी आकाश कंदील बनवून आपल्या अंगभूत कला गुणांना वाव देण्याचा साजेसा प्रयत्न केला आहे. तिसरीच्या वर्गातील ४६ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. दरम्यान आपल्या मुलांची कला नजरेतून पहाण्यासाठी बुधवारी (८) मुलांच्या पालकांनी आश्रम शाळेला भेट देऊन मुलांचे तोंड भरून कौतुक केले.
आश्रम शाळेचे शिक्षक महादेव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांकडून दिवाळीसाठी आकाश कंदील बनवून घेतले आहेत. या आश्रम शाळेत, मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. आश्रम शाळेतील महादेव डोईफोडे या ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अशिक्षित पालकांना लिहिता वाचता यावे यासाठी देखील त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षणाचे धडे देण्याची सुरुवात केली आहे असून, हे पालक आता अंगठ्याच्या जागी सही करू लागले आहेत. नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे या आश्रम शाळेत उरण, पनवेल, पेण तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत.