नांदगाव/ मुरु ड : मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीत जंजिरा किल्ला असल्याने येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. २२ बुरु ज असलेला व २२ एकर परिसरात हा किल्ला आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात उभ्या असलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत. कलाल बांगडी नावाची पंचधातूने बनवलेली सुमारे पाचशे किलो वजनापेक्षा जास्त वजनाची इतिहासकालीन तोफसुद्धा बघण्यास असंख्य पर्यटक येथे येत असतात. या सर्व गोष्टींची दखल घेऊन पुरातत्त्व विभागाने या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली आहे.सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावरील पावसामुळे वाढलेली झाडेझुडपे कापून येण्या- जाण्याची वाट मोकळी करण्यात आली आहे. या जंजिरा किल्ल्याच्या मध्यभागी गोल अंड्याच्या आकाराचा असणारा तलाव पुरातत्त्व विभागाने स्वच्छ के ला असून यामधील शेवाळ काढून टाकले, तसेच काही पर्यटकांनी रिकाम्या प्लास्टिक बॉटल व अन्य कचरा टाकून तलावाच्या सौंदर्यास बाधा आणली होती. आता हा सर्व कचरा काढल्याने, हा तलाव स्वच्छ होऊन पुन्हा एकदा गतवैभव या तलावास मिळाले आहे. तलावाभोवती वाढलेले गवत सुद्धा काढून टाकण्यात आले आहे. दुसरे तलावही साफ करण्याचे काम सुरू आहे. किल्ल्यावरील साफसफाई मोहीम पुरातत्त्व खात्याकडून सुरू असल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले असून स्थानिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)
पुरातत्त्व खात्याकडून जंजिऱ्याची साफसफाई
By admin | Published: February 09, 2017 4:50 AM