अलिबाग : जीवनात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे याबाबत प्रत्येकाने जागरूक असलेच पाहिजे. स्वच्छतेमुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच मानवाचे आरोग्य सुदृढ बनण्यास मदत मिळते. स्वच्छतेचा मंत्र सर्वांनीच जोपासला पाहिजे, असे विचार प्रजापिता ब्रम्हाकुमारी अलिबाग सेवा केंद्राच्या सहायक संचालिका अंजू पारीख यांनी व्यक्त केले.
अलिबाग शहरातील स्मशानभूमीसमोरील फुलनगर झोपडपट्टी येथील परिसराची स्वच्छता मोहीम रायगडचा युवक फाउंडेशन आणि प्रजापिता ब्रम्हाकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष रायगडचा युवक फाउंडेशनचे प्रमुख जयपाल पाटील होते.
अलिबाग एसटी स्टॅण्ड परिसर आणि शहरामध्ये गेल्या २५ वर्षांपासून पारधी समाजातील कुटुंब गजरा विकण्याचे काम करतात. अलिबाग नगरपालिकेच्या तत्कालीन नगराध्यक्षा नमिता प्रशांत नाईक यांनी त्यांना स्मशानभूमीसमोरील जागेत राहण्यास परवानगी दिली होती. याच ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते. त्यांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी सायंकाळी ४ वाजता स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. अख्खा परिसर स्वच्छ करण्यात आला.
चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी लहान मुलांसाठी बाल संस्कार शिबिर लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे जयपाल पाटील यांनी सांगितले. अलिबाग नगर पालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने येथील नागरिकांना तीस डस्टबीन मंजूर करण्यात आल्याचेही पाटील यांनी स्पष्ट करून नाईक यांचे आभार मानले. स्वच्छता मोहिमेसाठी लागणारे मास्क, हातमोजे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. याप्रसंगी सुनयना वतक, अश्वीन पुराणीक,पारीखा ढावरे, विलास केदारी, श्रीरंग, दीपाली रोकडे, शारदा गवळी, मालन पवार यांच्यासह अन्य उपस्थित होते.
टूथ ब्रश, पेस्टचे वाटपयेथील स्थानिक मुलांना स्वत:च्या आरोग्याचे महत्त्व समजावे यासाठी टूथ ब्रश आणि पेस्टचे वाटप करण्यात आले. फुलनगर झोपडपट्टी येथील परिसराची स्वच्छता के ल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी येथी सफाई करण्यात आली, त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.