जिल्ह्यातील चार हजार मंदिरांमध्ये प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम

By निखिल म्हात्रे | Published: January 17, 2024 03:14 PM2024-01-17T15:14:25+5:302024-01-17T15:15:06+5:30

22 जानेवारी रोजी बहुतांश मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

Cleanliness campaign through the administration in four thousand temples of the district | जिल्ह्यातील चार हजार मंदिरांमध्ये प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम

जिल्ह्यातील चार हजार मंदिरांमध्ये प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम

अलिबाग - अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभर उत्साहाचे वातावरण आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील चार हजार 148 मंदिरांमध्ये प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच, 22 जानेवारी रोजी बहुतांश मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

आपला देश संविधानावर चालतो. त्यामुळे सर्वधर्मसमभाव अशी शिकवणं आपल्याला आतापर्यंत मिळाली आहे. मात्र, राम मंदिराच्या कार्यक्रमामुळे फक्त हिंदुंच्याच मंदिरांची स्वच्छता आणि रोषणाई होणार असल्याचे एकंदर परिस्थितीवरुन दिसून येते. त्यामुळे पोटात दुखण्याचे कारण नाही. रामाचे मंदिर होत आहे, यामध्ये नक्कीच आनंद आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील सर्वधर्माचा सन्मान केला होता. पुरोगामी महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार लाभले आहेत. हे सरकार आणि प्रशासनाने विसरता कामा नये, याची आठवण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी करुन दिली.

जिल्हा प्रशासनाने मंदिरांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील चार हजार 148 मंदिरांची स्वच्छता केली जाणार आहे. या मंदिरांपैकी 177 रामाची मंदिरं आहेत. शहरी भागांमध्ये 213 मंदिरं आहेत. पैकी 25 मंदिरं रामाची आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये तीन हजार 935 मंदिरं असून, पैकी 152 मंदिरांमध्ये रामाची मूर्ती आहे. दरम्यान, निवडणूक जवळ आल्याने भाजपाने आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली असल्याचे दिसून येते. सरकारी यंत्रणेचा वापर यासाठी सर्रासपणे केला जात असल्याचे आपण गेल्या काही कालावधीत पाहिले आहे.

सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील मंदिर, शाळा यांची स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे. यासाठी लोकसहभाग घेतला जात आहे. 22 जानेवारीला मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित ट्रस्ट, दानशूर व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे. वेळ पडल्यास स्वच्छतेसाठी असणाऱ्या 30 टक्के निधीतून आर्थित तरतूद करण्यात येईल.
- डॉ. भारत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

 

Web Title: Cleanliness campaign through the administration in four thousand temples of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.