स्वच्छता योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल, रायगडचे माजी जिल्हाधिकारी निपुण विनायक यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 05:28 AM2018-04-15T05:28:54+5:302018-04-15T05:28:54+5:30
डॉ. निपुण विनायक यांच्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानास राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप बनविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या या अनन्यसाधारण कामगिरीस राष्ट्रीय स्तरावर राजमान्यता देऊन, त्यांच्या कामाचा आदर्श ठेवून त्यांचे अनुकरण व्हावे, या हेतूने त्यांना हा विशेष राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय ज्युरी मंडळाने एकमताने घेतला आहे.
- जयंत धुळप
अलिबाग : राष्ट्रीय स्वच्छता अभियान अमलात येण्यापूर्वी आपल्या स्तरावर कचरामुक्त जिल्हा संकल्पना यशस्वी करून त्यानंतरच्या टप्प्यात राष्ट्रीय स्वच्छता अभियानात राष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण योगदान देणारे रायगडचे माजी जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे संचालक तथा केंद्र सरकारमधील विद्यमान उपसचिव डॉ. निपुण विनायक यांची विख्यात शास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. आर. ए. माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील देशातील मान्यवर संस्थांच्या १३ प्रतिनिधींच्या ज्युरी मंडळाने निवड केली आहे.
इंडिया सॅनिटेशन कोएलिशन या नैना लाल किडवई यांच्या अध्यक्षतेखाली देशातील स्वच्छता विषयक उपक्रमास सहकार्य करणारी संस्था आणि फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने या ज्युरी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. निपुण विनायक यांच्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानास राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप बनविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या या अनन्यसाधारण कामगिरीस राष्ट्रीय स्तरावर राजमान्यता देऊन, त्यांच्या कामाचा आदर्श ठेवून त्यांचे अनुकरण व्हावे, या हेतूने त्यांना हा विशेष राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय ज्युरी मंडळाने एकमताने घेतला आहे.
चंदिगडमध्ये जन्म झालेले डॉ. निपुण विनायक यांचे शालेय शिक्षण चंदिगडमध्येच झाले. सन २००१मध्ये चंदिगड सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी सुवर्ण पदकासह एमबीबीएस पदवी संपादन केली. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेकरिता (आयएएस) निवड झाल्यावर त्यांनी लालबहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी आॅफ अॅडमिनिस्ट्रेशन येथे आयएएस प्रशिक्षणादरम्यान, त्यांना ‘डायरेक्टर बेस्ट आॅल राउंड ट्रायनी अॅवॉर्ड’सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
महाराष्ट्रात जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू झाल्यावर आपल्या अनोख्या कार्यपद्धतीतून प्रशासकीय सुधारणांसाठी असलेल्या राजीव गांधी अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट काम करून दाखविले होते. त्यांच्या या राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन, तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय राजीव गांधी अभियान पुरस्कारातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले होते. नांदेड महापालिका आयुक्त म्हणून देखील त्याची कारकिर्द लोकसहभागातून परिवर्तन घडवून आणण्यात यशस्वी ठरली होती.
‘कचराकुंडीमुक्त अलिबाग’ पहिले यश
सार्वजनिक हिताच्या व उपयुक्ततेच्या उपक्रमांच्या यशस्वीतेकरिता ‘उत्कटता, सहभाग आणि भागीदारी’ अशा त्रिसूत्रीची निर्मिती डॉ. निपुण विनायक यांनी करून त्यायोगे विविध विकास प्रकल्पांमध्ये शासनासह लोकप्रतिनिधी व जनसामान्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविण्यात रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना, आगळे यश मिळविले होते. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या सहभागाने डॉ. विनायक यांनी यशस्वी केलेले ‘कचराकुंडीमुक्त अलिबाग’ अभियान, हे स्वच्छ भारत अभियानाच्या यशाचे पहिले यश होते.
युनोसेफ द्वारा पुस्तक प्रकाशन
डॉ. विनायक यांनी देशातील विविध २० राज्यांचा अभ्यास करून, अस्वच्छतेबाबतच्या जनसामान्यांच्या सवयी बदलण्याकरिता त्यांनी केलेले उपक्रम महत्त्वपूर्ण व प्रभावी ठरले आहेत.
याच अनुषंगाने त्यांनी लिहिलेली स्वच्छता विषयक पुस्तके पुणे येथील यशदा या संस्थेने, तर ‘शिक्षण आणि आरोग्यामधील नवकल्पना’ हे पुस्तक युनोसेफ द्वारा प्रकाशित करण्यात आले आहे.
डॉ. निपुण विनायक यांनी जिल्हास्तरावर राबवून लोकसहभागातून यशस्वी केलेल्या सार्वजनिक हितांच्या अनेक उपक्रमांची अंमलबजावणी राज्यस्तरावर तर स्वच्छता अभियान या उपक्रमाची राष्ट्रीयस्तरावर अंमलबजावणी करण्यात आली आहे.