विभाग कार्यालयाला स्वच्छतेचे वावडे; सानपाड्यातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 01:14 AM2020-01-03T01:14:00+5:302020-01-03T01:14:08+5:30
शहरात स्वच्छता अभियान राबविणाऱ्या प्रशासनाचे दुर्लक्ष
नवी मुंबई : स्वच्छता अभियान राबविणाºया महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाच्या नवीन इमारतीत स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. इमारतीचा जिना आणि टेरेसमध्ये अडगळीचे साहित्य ठेवण्यात आले असून, कचरा आणि धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे महापालिकेला कार्यालयांनाच स्वच्छतेचा विसर पडल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया स्वच्छ सर्वेक्षण २०२० या उपक्रमाच्या माध्यमातून शहरात विविध कामे सुरू आहेत. सर्वेक्षण स्पर्धेच्या निमित्ताने शहरात स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये, तसेच देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई शहराचा पहिल्या तीन क्र मांकात समावेश व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामार्फत विविध कामांना सुरु वातही करण्यात आली आहे. शहरात अभियान राबविताना स्वच्छतेची सवय नागरिकांनाही लागावी, यासाठी पालिकेच्या वतीने विविध स्तरावर स्वच्छतेच्या स्पर्धाही घेतल्या आहेत.
तुर्भे येथील महापालिकेच्या विभाग कार्यलयाची दुरवस्था झाल्याने त्या इमारतीची डागडुजी सुरू करण्यात आली आहे. डागडुजी काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विभाग कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या सानपाडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी विविध कामांसाठी येणाºया नागरिकांची कायम वर्दळ असते. मात्र इमारतीच्या आवारात अस्वच्छता पसरली आहे. जिन्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ साचली असून, कचराही पडला आहे. काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या इमारतीच्या जिन्यामध्ये पावसामुळे गळती झाले असून, भिंतींचा रंगही खराब झाला आहे. यामुळे इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इमारतीच्या टेरेस भागात डेब्रिज, वाहनांच्या वापरात नसलेल्या टायरच्या ट्युब, भंगार लोखंडी रॅक आदी अडगळीचे साहित्य पडले असून शहरात स्वच्छतेसाठी लाखो रु पयांचा खर्च करणाºया विभाग कार्यालयाच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.