स्वच्छतेतून समृद्धी निश्चित- डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 12:06 AM2020-03-02T00:06:44+5:302020-03-02T07:13:11+5:30
अस्वच्छता दूर करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून ती वैयक्तिक मानून स्वच्छता केल्यास सर्वात मोठा फायदा आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास होईल व देश समृद्ध होईल.
रेवदंडा : आपला देश खरोखरच सुजलाम, सुफलाम होण्यासाठी स्वच्छतेतूनच समृद्धता निश्चित येते, यासाठी अस्वच्छता दूर करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून ती वैयक्तिक मानून स्वच्छता केल्यास सर्वात मोठा फायदा आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास होईल व देश समृद्ध होईल.
प्रथम दर्शनी अनेकांना हे विचार पटणार नाहीत; परंतु शांतपणे खोलवर जाऊन विचार केल्यास स्वच्छता ही समृद्धीकडे नेणारी असल्याचे लक्षात येईल, असे मार्गदर्शक विचार ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची जंयती व निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत रेवदंडा परिसरात श्रीसदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. त्याप्रसंगी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी बोलत होते. या स्वच्छता मोहिमेत गावातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ता, बसस्थानक, विविध नाके चकाचक करण्यात आले.
। डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे विविध उपक्रम
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत सातत्याने समाजोपयोगी उपक्र म राज्यभर राबवले जातात, त्यामध्ये प्रामुख्याने वृक्षलागवड आणि संवर्धन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, दाखले वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांना मदत, उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर, जनजागृती शिबिर, पाणपोई, आपद्ग्रस्तांना मदत यासारखे अनेक उपक्र म राबवले जातात.गेल्या काही वर्षांपासून प्रतिष्ठानमार्फत देशभरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. त्यांच्या या महान कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत त्यांनी ज्येष्ठ निरु पणकार डॉ. आप्पासाहेब तथा दत्तात्रेय धर्माधिकारी यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली. देशभरातील सर्वच स्तरातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत आपापले योगदान दिले. त्यामुळेच स्वच्छ भारत अभियानाला योग्य दिशा मिळाली आणि स्वच्छ भारत अभियान यशस्वी झाले.