अलिबागमधील तीन संस्थांचा राज्यस्तरावर गौरव, कुलाबा, कोर्लई किल्ल्यांची केली स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 02:30 AM2017-11-25T02:30:47+5:302017-11-25T02:31:02+5:30
अलिबाग : जागतिक वारसा सप्ताह कालावधीत आयोजित गडकोट स्वच्छता अभियानात सहभागी होऊन अलिबागच्या समुद्रातील ऐतिहासिक कुलाबा किल्ला आणि कोर्लई किल्ला यांची संपूर्ण स्वच्छता युथ हॉस्टेल असोसिएशन आॅफ इंडिया (अलिबाग युनिट)चे कार्याध्यक्ष सुनील दामले, एक्स एनसीसी कॅडेट संस्थेचे हेमचंद्र पाटील आणि मावळा प्रतिष्ठानचे यतिराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तीन संस्थांच्या सुमारे १०० युवा मावळ््यांनी केली.
अलिबाग : जागतिक वारसा सप्ताह कालावधीत आयोजित गडकोट स्वच्छता अभियानात सहभागी होऊन अलिबागच्या समुद्रातील ऐतिहासिक कुलाबा किल्ला आणि कोर्लई किल्ला यांची संपूर्ण स्वच्छता युथ हॉस्टेल असोसिएशन आॅफ इंडिया (अलिबाग युनिट)चे कार्याध्यक्ष सुनील दामले, एक्स एनसीसी कॅडेट संस्थेचे हेमचंद्र पाटील आणि मावळा प्रतिष्ठानचे यतिराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तीन संस्थांच्या सुमारे १०० युवा मावळ््यांनी केली. त्याची दखल घेऊन गुरुवारी मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी ‘गड संवर्धनाच्या मार्गावर’ या पुरातत्व संचालनालयाच्या वतीने प्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचीन वास्तू, स्मारके, गड-किल्ले हा आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला वारसा अमूल्य असून, त्यांचे जतन करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यासाठी पुरातत्व विभाग प्रयत्नशील असून गड-किल्ले स्वच्छतेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे, अशी घोषणा तावडे यांनी या वेळी बोलताना केली. राष्ट्रीय संपत्ती असलेल्या या पुरातन गोष्टींचे जतन करणे, पावित्र्य आणि सौंदर्य जपणे, तेथे स्वच्छता ठेवणे यासाठी विविध संस्थांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. यापुढील काळातही आपला जागतिक वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जनसामान्यांमध्ये प्राचीन स्मारके व वास्तू जपण्याची भावना असणे आवश्यक आहे. आपला प्राचीन वारसा जतन करण्याचे काम केवळ राज्य सरकारचे नसून, यामध्ये लोकसहभागही आवश्यक आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव योजनेसाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीदेखील या वेळी तावडे यांनी दिली. कार्यक्र मास पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, पुराभिलेख विभागाचे संचालक सुशील गर्जे, गड संवर्धन समितीचे पांडुरंग बलकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
>प्राचीन वारशाबद्दल जागृती
युनेस्कोद्वारा १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन तर केंद्र शासनामार्फत १९ ते २५ नोव्हेंबर हा ‘जागतिक वारसा सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
सर्वसामान्यांमध्ये प्राचीन वारशाबद्दल जागृती निर्माण करणे व भावी पिढ्यांना सांस्कृतिक ठेव्याविषयी आस्था निर्माण करणे हा हेतू असतो. या मोहिमेचा भाग म्हणून राज्य सरकारच्यावतीने जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यात आला.