अलिबाग : जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची लोकचळवळ यशस्वी होत आहे. गावाने एकजुटीने स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केल्यामुळे आज हा कार्यक्रम पार पडला. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. या गावाची स्वच्छतेतील कामगिरी कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन म्हसळा गटविकास अधिकारी नीलिमा गाडे यांनी केले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित हागणदारीमुक्ती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.‘घर तिथे शौचालय’ ही संकल्पना साकारत असलेल्या म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ज्ञ व गावातील सरपंच, पदाधिकारी, व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित हागणदारीमुक्ती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल - ताशांच्या गजरात व स्वच्छतेच्या घोषणा देत विद्यार्थी व शिक्षक, ग्रामस्थ यांनी समाजमंदिरापासून प्रभात फेरी काढली. हागणदारीमुक्तीचा बॅनर व स्वच्छतेच्या घोषणांचे फलक हातात घेवून संपूर्ण गावात हा जल्लोष करण्यात आला. मंदिरासमोर स्वच्छतेची शपथ देण्यात आली. प्राथमिक शाळेत सरपंच रेखा भायदे व गटविकास अधिकारी नीलिमा गाडे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. स्वच्छतेत सातत्य ठेवणे व शौचालयाच्या वापराबरोबरच घनकचरा व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे,असे आवाहन यावेळी बोलताना रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी केले. यावेळी संवादतज्ज्ञ सुरेश पाटील व दिलासा फाउंडेशन अध्यक्ष किरण शिरगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विस्तार अधिकारी डी.एस.दिघीकर, उपसरपंच प्रकाश लोणशीकर, जि.प.चे मनुष्यबळ विकास सल्लागार आनंद धिवर, समाजशास्त्रज्ञ रविकिरण गायकवाड, स्वच्छता तज्ज्ञ सुशांत नाईक, मुख्याध्यापक आर.बी. सावंत आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची
By admin | Published: August 18, 2015 2:53 AM