सिकंदर अनवारे, दासगांवरायगड महोत्सव संपल्यानंतर या महोत्सवाचे ठेकेदार नितीन देसाई यांनी पाचाड गावची साफसफाई केली. मात्र महत्त्वाच्या वास्तू, हत्ती, घोडे, मंडपाचे सामान उचलून मंडपाच्या कापडातील टाकाऊ चिंध्या, खोके, प्लास्टिकच्या बाटल्या तेथेच टाकून गड सोडला. महोत्सवानंतर गडावरील सफाईचे काम मात्र केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या माथी मारले गेले. पुरातत्त्व विभाग गडावरील केरकचरा गोळा करीत आहेत आणि हा कचरा किल्ल्यावर जाळला जात असल्याने प्रदूषण होत आहे.२१ ते २४ जानेवारी हे चार दिवस पाचाड आणि किल्ले रायगडावर रायगड महोत्सव साजरा करण्यात आला. कोट्यवधी रुपये महोत्सवावर खर्च केले जात असताना तेथील स्थानिकांच्या मूलभूत सोईसुविधांचे काय, या प्रश्नावरून हा महोत्सव सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कोणताही उत्सव, महोत्सव, जत्रा साजऱ्या झाल्या की त्या जागेच्या स्वच्छतेकडे आयोजक कधीही पाहात नाहीत. सामाजिक संस्थांना साफसफाईची ही जबाबदारी पार पाडावी लागते. नितीन देसाई हे ठेकेदार असले तरी या महोत्सवाचे आयोजक महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक संचालनालय होते. त्यामुळे महोत्सव साजरा झाल्यानंतर स्वच्छतेत कोठेही कमी पडणार नाही, अशी भावना होती. मात्र ती भावना या महोत्सवानंतर फोल ठरली आहे.महोत्सव पार पडल्यानंतर ठेकेदार देसाई यांनी सामानाची बांधाबांध केली. ती करीत असताना पाचाड गावातील साफसफाई अगदी प्रामाणिकपणे केली, मात्र साफसफाईतील तो प्रामाणिकपणा त्यांनी किल्ले रायगडावर दाखविला नाही. किल्ले रायगडावरील राण्यांच्या महालात राज्याभिषेकापूर्वी महिलांची लगबग दाखविली होती. यासाठी वेगवेगळे सेट उभे क रण्यात आले होते. हे सेटचे सामान, मंडपाचे कापड, महत्त्वाच्या वस्तू, नेण्यात आले. मात्र कापडाच्या चिंध्या, तुटलेले दोरखंड, तारांचे तुकडे आदी टाकावू सामान त्याच ठिकाणी टाकण्यात आले. किल्ल्यावरील पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांनी गड बकाल झाला आहे.
रायगड किल्ल्याची स्वच्छता
By admin | Published: February 03, 2016 2:16 AM