बोर्ली-मांडला : तळा तालुक्यातील तळगड या किल्ल्यावर कोकण कडा मित्र मंडळ यांच्या वतीने शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गेली अनेक वर्षे विविध गड व दुर्गांच्या स्वच्छतेचा वसा घेतलेल्या कोकण कडा मित्र मंडळाने तळगड संवर्धनाच्या दृष्टीने काही आखणी केली असून भविष्यात दुर्लक्षित किल्ल्यावर असंख्य शिवभक्त येऊन तळगडाचा जागर करतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी झालेल्या बैठकीत दिली. यावेळी तळा येथील मी शिवभक्त प्रतिष्ठान, जय हरी सेवा मंडळ व माणगाव येथील जाणता राजा प्रतिष्ठान या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.गडसंवर्धनाच्या ध्येयाने काम करणाऱ्या कोकण कडा मित्र मंडळाने शनिवारी भग्नावस्थेत गेलेल्या तळगड किल्ल्याची पाहणी केली. यात हनुमान दरवाजा, मुख्य प्रवेशद्वाराची सध्या खूपच पडझड झालेली दिसते. गडावर पाण्याच्या चार ते पाच टाक्या असून त्यात खूप गाळ साचलेला आहे. उद्ध्वस्त शिवमंदिर, मोडकळीस येत असलेली तटबंदी, झाडे वाढल्याने ढासळू पाहणारी बुरु जे याकडे पुरातत्व खात्याने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. गडावर जाण्यासाठी दरवर्षी येथील संस्था दगडी व मातीच्या सहाय्याने पायऱ्या बनवतात. तेव्हा गडावर जाणे सुसह्य होते. गडावर आजही हौशी पर्यटक येतात, परंतु प्लॅस्टिकच्या वस्तूंची फेकाफेक करीत गडाचे पावित्र्य नष्ट करतात. स्वच्छता मोहिमेत प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आला. पुरातत्व खात्याने अशा महत्त्वपूर्ण गडांकडे दुर्लक्ष केल्याने जयहरी सेवा मंडळ, मी शिवभक्त प्रतिष्ठान अशा स्थानिक संस्था तळगड संवर्धनासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पुढे सरसावल्या आहेत.स्वच्छता मोहिमेनंतर पायथ्याशी असलेल्या देवस्थानासमोरील प्रांगणात एक बैठक घेण्यात आली. बैठकीत कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, दीपक शिंदे, महेश मोरे यांनी गड संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
शिवभक्तांकडून तळगड किल्ल्याची स्वच्छता
By admin | Published: January 29, 2017 2:23 AM