दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 08:04 AM2021-04-01T08:04:06+5:302021-04-01T08:04:30+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिमा पुनः प्रतिष्ठापनेचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, ३१ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढत हे सोने सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
श्रीवर्धन : गेल्या अनेक वर्षांपासून दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिमा पुनः प्रतिष्ठापनेचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, ३१ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढत हे सोने सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. याच सोन्याचा वापर करून गणपतीचा अर्धांग मुखवटा तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या दिवशी गणपतीचा अर्धांग मुखवटा प्रथमच सापडला त्या दिवशी आणि योगायोगाने उच्च न्यायालयाने आदेश पारित केले, त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. आता लवकरच गणपतीच्या अर्धांग मुखवट्याची दिवेआगर येथील गणेश मंदिरात पुन्हा प्रतिष्ठापना होणार असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नगर जिल्ह्यातील फासेपारध्यांनी २३ मार्च २०१२ रोजी सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दरोड्यानंतर गणेशमूर्ती आगीवर वितळवली. प्राप्त माहितीनुसार, १४६६ ग्रॅम वजनाचे सोने दरोडेखोरांनी लंपास केले त्यानंतर जबरी चोरी, दरोडा आणि खून या विविध कलमांनुसार दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरोडेखोरांनी दरोड्यात पळविलेल्या सोन्यापैकी १३६१.४३ ग्रॅम सोने परत मिळविण्यात पोलिसांना यश आले. दरोडेखोरांना पकडण्यात आल्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाने सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा खटला चालू असताना रायगड सत्र न्यायालयात सोने परत मिळावे म्हणून दिवेआगर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने अर्ज करण्यात आला होता. परंतु सरकारने देवस्थानला दिलेला मुखवटाच अस्तित्वात राहिला नाही. सत्र न्यायालयाने सोने देवस्थान ट्रस्टला देण्यास नकार दिला आणि सोने सरकारजमा करण्याचा आदेश दिला.
या गुन्ह्यातील आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात अपील दाखल केल्यामुळे या सोन्याचा वापर करता येणे शक्य नव्हते आणि त्यामुळे २०१२ पासून मुखवटा त्याच सोन्यापासून परत बनविला जावा या आशेवर सर्व भाविक प्रतीक्षेत होते. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी वर्धन अमित शेडगे यांनी उच्च न्यायालयातील सरकारी वकील श्रीकांत गावंड यांच्यामार्फत अर्ज दाखल केला. गुन्ह्यानंतर परत मिळविण्यात आलेल्या सोन्यापासून मूळ गणपतीच्या अर्धांग मुखवट्यासारखा मुखवटा बनवून तो पुन्हा दिवेआगर येथील गणेश मंदिरात ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. ३१ मार्चला या अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर झाली.
जनतेला अपेक्षित असलेला निकाल लागलेला आहे. या प्रकरणी वारंवार पाठपुरवठा केलेला आहे. निश्चितच उच्च न्यायालयाच्या निकालाचे रायगडकरांच्या वतीने मी स्वागत करतो.
- सुनील तटकरे,
खासदार, रायगड
उच्च न्यायालयाचा आजचा निकाल ही श्रींची इच्छा आहे. स्थानिक सर्व नागरिकांची इच्छा होती अगोदरचा मुखवटा पुन्हा मिळावा. त्या स्वरूपाचा निकाल उच्च न्यायालयाने दिलेला आहे. माझा आनंद द्विगुणित झाला आहे.
- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड
उच्च न्यायालयाच्या निकालाचे हार्दिक स्वागत आहे. दिवेआगरमधील जनतेला अपेक्षित असलेला निकाल लागला आहे.
- उदय बापट, सरपंच, दिवेआगर