कर्मचारीविरोधी धोरण बंद करा
By admin | Published: June 30, 2017 02:55 AM2017-06-30T02:55:46+5:302017-06-30T02:55:46+5:30
महापारेषण कंपनीमधील तंत्रज्ञ वर्गातील कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षांपासून रखडलेला पदोन्नतीचा प्रश्न सोडविण्यासहित मागासवर्गीय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापारेषण कंपनीमधील तंत्रज्ञ वर्गातील कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षांपासून रखडलेला पदोन्नतीचा प्रश्न सोडविण्यासहित मागासवर्गीय कर्मचारीविरोधी धोरण बंद करण्याच्या मागणीसाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे महापारेषणचे वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रकाशगंगा या सांघिक कार्यालयात २७ जूनपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
कनिष्ठ तंत्रज्ञांना गेल्या १५ ते २० वर्षांपासून पदोन्नतीची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण आहे. संघटनेने कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबतची मागणी प्रशासनासमोर मांडली; परंतु गेल्या पाच महिन्यांत यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, असे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची बेकायदेशीर पद्धतीने मुख्य अभियंता पदावर भरती करून मागासवर्गीय अधीक्षक अभियंता यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले. त्यामुळे संघटनेने साखळी उपोषणाचा इशारा दिला; परंतु उपोषणाचा इशारा देऊन दोन आठवड्यांहून अधिक वेळ गेला, तरीही अद्याप चर्चेसाठी बोलाविण्यात आले नाही. परिणामी, संघटनेतर्फे २७ जूनपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.