ममदापूर ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राउंड बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:24 AM2019-06-07T00:24:38+5:302019-06-07T00:24:51+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : उल्हास नदीकाठावर कचऱ्याचा ढीग
नेरळ : कर्जत तालुक्यातून वाहत जाणाºया उल्हास नदीतून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दिवसेंदिवस उल्हास नदीचे पाणी दूषित होत आहे, अनेक गावे शहराचे सांडपाणी, जलपर्णी तर उल्हास नदीत टाकला जाणारा कचरा यामुळे परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. ममदापूर ग्रामपंचायतीने देखील ग्रामपंचायत हद्दीत जमा झालेला कचरा उल्हास नदीच्या काठावर टाकण्यास सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात हा कचरा नदीत जाण्याची शक्यता असल्याने हे डम्पिंग ग्राउंड बंद करावे यासाठी स्थानिकांनी सह्यांची मोहीम राबविली असून हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत जमा झालेला कचरा येथील कर्मचारी गोळा करून घंटागाडीमधून उल्हास नदीच्याकाठी टाकत आहेत. उल्हास नदीच्या पाण्यावर तालुक्यातील शेलू, वांगणी, बदलापूर येथे अनेक पाणी योजना अवलंबून आहेत. तरी सुद्धा अनेक शहरातील सांडपाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस उल्हास नदीत जलपर्णी निर्माण होते आणि परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे.
ममदापूर ग्रामपंचायतीने देखील डम्पिंग ग्राउंड पेशवाई रस्त्यावर नदीच्या काठावर सुरू केले आहे. यामुळे पावसाळ्यात हा कचरा पाण्याच्या प्रवाहात नदीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड तत्काळ हलविण्यात यावे, यासाठी ग्रामस्थ राम हिसाळगे व अन्य ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम देखील राबविण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी रायगड, नेरळ ग्रामपंचायत, नेरळ पोलीस स्टेशन यांना दिले आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड लवकरात लवकर हलविण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे.