कर्जत : एका महिन्यासाठी शहापूर-मुरबाड-पाटगाव-कर्जत-खोपोली या नव्याने घोषित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ अ च्या कर्जत तालुक्यातील कळंब-मार्केवाडी दरम्यान असणारा छोटा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे, यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दुर्घटना टाळण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत.भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग मंत्रालयाने शहापूर-मुरबाड-पाटगाव कर्जत-खोपोली हा रस्ता नवीन राष्ट्रीय महामार्ग ५४८अ चा भाग घोषित केला आहे. या रस्त्याचे टणक बाजू पट्ट्यासह दुहेरीकरणाचे काँक्रीटीकरण बांधकाम (ईपीसी) तत्त्वावर केंद्रीय मंत्रालयाच्या निर्देशानुसार म.रा.र.वि महामंडळ (एमएसआरडीसी) मुंबई मार्फत हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याचे दुहेरीकरणाचे सविस्तर प्रकल्प अहवालानुसार सद्यस्थितीत येथील डांबर पृष्ठभागाची रुंदी ५.५ मीटर ते ७.५ मीटर इतकी आहे. रस्त्याची हद्द (आरओडब्ल्यू) रुंदी १८ ते ३० मीटर इतकी आहे. नवीन दुहेरीकरणाच्या बांधकामानुसार रस्त्याची रुंदी १४ मीटर आहे. १० मीटर काँक्रीट रस्ता व दोन्ही बाजूस दोन मीटर रुंदीची साइडपट्टी करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच लहान मोठ्या पुलांची पुनर्बांधणी रुंदीकरण हे १६ मीटर रुंदीसाठी प्रस्तावित आहेत, या कामांच्या दैनंदिन देखरेखीसाठी मे. मार्क टेक्नोक्रेट प्रायव्हेट लिमिटेड व मंगलम असोसिएट यांची प्राधिकृत अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देव यश ब्रिज गोपाल (जेव्ही) या एपीसी कंत्राटदाराने ४५.७०९ किलोमीटरवरील छोटा पूल क्षतिग्रस्त असल्याचे प्राधिकृत अभियंता यांना कळविले आहे, या पुलावरून वाहतूक सुरू ठेवल्यास दुर्घटना होऊ शकते, असे कार्यालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी बंद करावा, अशी मागणी के ली होती.>पर्यायी मार्गाचावापर करावारायगड जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षकांनी२४ डिसेंबर २०१९ रोजीच्या पत्रान्वये मुरबाडकडून जाणारी अवजड वाहने पुलावरून जाण्यास-येण्यास बंद केल्यास या वाहनांना मार्गस्थ होण्यास रायगड जिल्ह्यातून पर्यायी मार्ग उपलब्ध नाही; परंतु या पुलाच्या पलीकडून ठाणे जिल्ह्यातील बाटलेची वाडी येथून उजवीकडील वळणाने बदलापूर कात्रप-वांगणी-नेरळ -कर्जत अशा पर्यायी मार्गाने मार्गस्थ होता येईल. कर्जत चौककडून मुरबाडकडे जाणारी अवजड वाहने ही कर्जत-चारफाटा-नेरळ-वांगणी-बदलापूर -बाटलेची वाडी मार्गे मुरबाड या पर्यायी मार्गाने मार्गस्थ करता येतील, असा अभिप्राय सादर केला आहे.कर्जत तालुक्यातील कळंब-मार्केवाडी रस्त्यावरील पूल जड वाहतुकीस एक महिन्यासाठी बंद करण्यात आला आहे; तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.- वैशाली परदेशी-ठाकूर, प्रांताधिकारी, कर्जत
कळंब-मार्केवाडी रस्त्यावरील पूल जड वाहतुकीस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 1:32 AM