महाडमध्ये तीन तास महामार्ग बंद; बाजारपेठेत पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:11 AM2019-07-28T00:11:04+5:302019-07-28T00:11:15+5:30
संपूर्ण महाडमध्ये शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू होती.
दासगाव : महाड तालुक्याला शुक्रवारी संध्याकाळीपासून पावसाने झोडपण्यास सुरवात केली. मध्यरात्री काळ व सावित्री नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरासह गावांतही पुराचे पाणी घुसण्यास सुरवात झाली. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या पावसाने पुन्हा सर्वत्र २६ जुलै २००५ मधील अतिवृष्टीची आठवण अनेकांना करून दिली. मध्यरात्री साधारण तीनच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.
संपूर्ण महाडमध्ये शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू होती. सावित्री व काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडून महाड शहरात पाणी घुसण्यास सुरवात झाली. त्याचप्रमाणे तालुक्यातील दासगाव, वहूर, केंबूर्ली, गांधारपाले तसेच खाडी पट्ट्यातील अनेक गावात पूरजन्य स्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसाने महाड शहरातील वस्ती तसेच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली. सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने व्यापाºयांनी सुटकेचा निश्वास व्यक्त केला.
नडगाव परिसरात वाहतुकीत अडथळा ; चालक हैराण
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. नडगावजवळ शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास महामार्गावर दरड कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी महामार्गावरील वाहतुकीला फटका बसला. तीन तास महामार्ग बंद होता. चौपदरीकरण करणाºया ठेकेदार कंपनीने पाच पोकलेन आणि तीन जेसीबीच्या साहाय्याने तीन तासांच्या प्रयत्नांनी महामार्ग मोकळा करीत वाहतूक सुरू केली. मात्र अजूनही या ठिकाणी दरडीचा धोका कायम आहे. गेल्या वर्षी याच महामार्गावर केंबुर्ली गाव हद्दीत दरड कोसळून पाच तास महामार्ग बंद होता.