दोन वर्षांपासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:35 PM2018-10-23T23:35:10+5:302018-10-23T23:35:15+5:30
कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेची सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.
कर्जत : कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेची सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यातील सर्व सहा आरोग्य केंद्रांवर आणि त्या अंतर्गत असलेल्या ३२ आरोग्य उपकेंद्रे येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या केल्या जात नाहीत. त्यामागे अनेक कारणे असली तरी आपल्या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व्हावी असे कोणत्याही वैद्यकीय अधिकारी अथवा आरोग्य विभाग यांना वाटत नाही. वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी कुटुंब नियोजनांतर्गत ‘हम दो, हमारे दो’ या धोरणाबाबत सरकारकडून जागृती करण्यात येत असली तरी तालुक्यातील आरोग्य विभागाकडून यात हरताळ फासण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण अंतर्गत शस्त्रक्रिया बंद आहेत. यात कळंब, मोहिली, कडाव, नेरळ, खांडस, आंबिवली या सर्व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात अशी सेवा सुरू ठेवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने खासगी रु ग्णालयाचे फावते आहे.
सरकारी रु ग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या करण्यासाठी माफक खर्च येत असतो. कर्जत तालुक्यातील एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या होत नसल्याने शेवटी गोरगरीब रु ग्णांना खासगी रु ग्णालयाची पायरी चढावी लागत आहे.त्याचवेळी तेथे किमान १५,000 रु पयांपासून पुढे अधिक पैसे मोजावे लागत आहेत. ही बाब गोरगरीब कुटुंबांना परवडणारी नाही. त्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा तालुक्यातील किमान एका प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हावी अशी सोय करण्याची गरज आहे. त्याकडे मागील दोन वर्षांपासून आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे. कडाव, नेरळ, कळंब येथे नव्याने बांधकाम केल्याने तेथे शस्त्रक्रि या होत नाहीत तर आंबिवलीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने तेथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या होत नाहीत. त्याचवेळी मोहिली आणि खांडसमध्ये अपुऱ्या साधनसामग्री अभावी शस्त्रक्रि या होत नाहीत. हे सलग दोन वर्षे सुरू असल्याने खासगी रु ग्णालयामध्ये या शस्त्रक्रि या करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात.
.गोरगरीब महिलांना फॅमिली प्लॅनिंगचे आॅपरेशन करावे म्हणून अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांकडून मार्गदर्शन करण्यात येते. पण त्या शस्त्रक्रि या करण्यासाठी आरोग्य केंद्रात सोय आहे काय? याची माहिती त्यांना नाही.
- जैतू पारधी, अध्यक्ष कर्जत तालुका आदिवासी संघटना
शासनाने हे काम पूर्वी टार्गेट म्हणून यशस्वीपणे राबविले आहे. मात्र, आता महिला स्वत:हून शस्त्रक्रि या करण्यासाठी पुढे येतात आणि ग्रामीण रुग्णालयात अशा शस्त्रक्रि या केल्या जात आहेत.
- डॉ. श्याम पावरा, वैद्यकीय अधिकारी, कळंब