रोह्यात मराठा समाजाची बंदची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:34 AM2018-07-27T00:34:02+5:302018-07-27T00:34:54+5:30
रोहा बंदच्या हाकेला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रोहा : मराठा समाजाने गुरुवारी रोहा बंदच्या दिलेल्या हाकेला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोह्यातील औषधालय, शाळा, बँका सोडून रोहे शहरातील मीना बाजारपेठेसह नगरपालिका परिसरातील बहुतांशी दुकाने बंद ठेवण्यात आली होती, तर सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. रॅलीत रोहे शहरासह ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रॅलीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
रोहे शहरातील राम मारुती चौकापासून सकाळी ९ वा. रॅलीला सुरुवात झाली. मीना बाजारपेठेतून नगरपालिकेपर्यंत घोषणांनी परिसर दणाणून केला होता. नगरपालिकेच्या समोर या वेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात मराठा समाजाचे नितीन परब, विजयराव मोरे, समीर शेडगे, विनोद पाशिलकर, महेश सरदार, अमित उकडे, स्नेहा अंब्रे, राजेश काफरे, नीलेश शिर्के, सुजाता चाळके, सारिका पायगुडे, समीक्षा बामणे, सुहास येरूणकर, प्रशांत देशमुख यांच्या समवेत हजारोंच्या संख्येने रोहा तालुक्यातील मराठा समाज बांधव, महिला सहभागी झाल्या होत्या. मराठा समाजाच्या वतीने रोहा बंदमध्ये मोर्चेकऱ्यांनी कोणालाही वेठीस धरू नये, असे सांगण्यात आले होते. मोर्चातर्फे प्रांत अधिकारी रोहा यांना निवेदन देण्यात आले.
माणगाव : सकल सर्व मराठा समाजाने गेल्या वर्षा-दीड वर्षांपासून महाराष्ट्रात, देशात एक अभूतपूर्व, शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले. मात्र, या संयमाची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे आता तरी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी, असे वक्तव्य आमदार सुनील तटकरे यांनी केले आहे.
गोरेगाव येथे गावतलाव सुशोभीकरण व भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सुनील तटकरे म्हणाले, मराठा समाजाच्या मूलभूत प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केले, त्यामुळे संयमाचा उद्रेक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आता तरी सरकारने गांभीर्याने या संदर्भात उपाययोजना करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तळा येथे मराठा समाजाचा बंद शांततेत
तळा : मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्टÑात केलेल्या बंदच्या आवाहनानुसार बुधवारी तळा शहर बाजारपेठ पूर्ण बंद ठेवण्यात आली होती. त्या दिवशी बंद शांततेत पार पडला. संपूर्ण दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
दुसºया दिवशी २६ जुलै रोजी सकाळी सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते एक त्र येवून तळा शहरात शांततेत मोर्चा काढण्यात आला. त्यात रवि मुंढे (द. रा. शिवसेना प्रमुख), चंद्रकांत राऊत, माजी उपसभापती रेश्मा मुंढे, नगराध्यक्षा नगरसेवक अॅड. चेतन चव्हाण, नगरसेवक संदीप मोरे, नाना दळवी, विनायक मुंढे, भोसले आदी मोठ्या संख्येने सामील झाले होते. त्यानंतर तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.