- लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील रामराज परिसरात राष्ट्रीय पेयजल योजनेतून उभारण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले. सुमारे एक हजार ५०० ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी ही रामराज नदीपात्रात बांधलेली आहे. त्यामुळे ती कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.अलिबाग तालुक्यातील रामराज मोहल्ला, कोळीवाडा, मराठा आळी, दलित वस्ती असे चार पाडे आहेत. येथील नागरिकांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सुमारे ४५ लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना २०१३ आखण्यात आली होती. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या कामाची निविदा काढली होती. २०१६ पर्यंत काम पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र २०१७ उजाडले तरी, काम पूर्ण झाले नव्हते.मुळात नदीपात्रात टाकी बांधण्याला स्थानिक ग्रामस्थ संतोष काटे यांनी आक्षेप घेत रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीची गांभीर्याने दखल न घेतल्याने ते काम तसेच सुरु ठेवून पाण्याची टाकी रामराज नदीपात्रामध्ये उभारली. नदीपात्रात पाण्याची टाकी बांधल्याने नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यात ती पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय झाला आहे, असे असताना ठेकेदाराने आता नदीपात्रातून पाइपलाइनचे काम दोन दिवसांपूर्वी सुरु केले होते मात्र पुराच्या पाण्याचा पाण्याच्या टाकीला धोका आहे, तसाच पाइपलाइनला आहे. त्यामुळे काम बंद ठेवण्याबाबत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रकाश माळी यांना कळविले असल्याचे ग्रामपंचायत सदस्य नदीम बेबन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.यातील गंभीर बाब म्हणजे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये उमटे धरणातील पाणी सोडण्यात येणार आहे. उमटे धरणाच्या पाण्यासाठी फिल्टरेशन प्लॅन्ट अद्याप बसविण्यात आलेले नाही. त्याबाबतचे सुमारे दोन कोटी ९० लाख रुपयांचे बिल मात्र ठेकेदाराला अदा करण्यात आलेले आहे. अशुध्द पाणीपुरवठ्यामुळे आधीच रान पेटले असताना आता नव्याने पाइपलाइनचे काम करण्यात येत होते. त्याला आक्षेप घेतला असल्याचे अॅड.कौस्तुभ पुनकर यांनी सांगितले.रामराज मोहल्ला, कोळीवाडा, मराठा आळी आणि दलित वस्ती या भागातून आधीच पाइपलाइन गेलेली आहे. त्याच पाइपलाइनचा वापर करता आला असता मात्र ठेकेदार आणि अधिकारी यांची पोट भरण्यासाठी अशा योजना आखल्या जातात, असे नदीम बेबन यांनी सांगितले. पाण्याच्या टाकीचे सुमारे १२ लाख ५० हजार रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत. मुळात नदीपात्रात बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीलाच आमचा आक्षेप असल्याचेही नदीम बेबन यांनी स्पष्ट केले. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रकाश माळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.पूरजन्य परिस्थितीत टाकी कोसळण्याची शक्यताजून ते नोव्हेंबर या कालावधीत नदीच्या पात्रामध्ये पूरजन्य परिस्थिती असते. त्यामुळे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकी खालील जमिनीची धूप होते. त्याचा फटका नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला बसण्याची शक्यता आहे.पाण्याची टाकी बांधण्यासाठी परवानगी नाहीलोकवस्ती नदीच्या अलीकडे असताना पाण्याची टाकी मात्र नदी पात्राच्या पलीकडे बांधण्यात आली आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात टाकीसह पाइपलाइनही तुटण्याची शक्यता आहे. एकदा सर्व काही पाण्यात गेले की पुन्हा नव्याने योजना राबविण्यास अधिकारी, ठेकेदार तयार राहतील आणि सरकारचे लाखो रुपये पुन्हा पाण्यात घालवून स्वत:ची तुंबडी भरुन घेतील. तसेच नदीपात्रात पाण्याची टाकी बांधण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पाणीपुरवठा योजनेचे काम पाडले बंद
By admin | Published: June 13, 2017 3:01 AM