मुरुड जंजिरा : मुरुडसह अनेक समुद्रकिनाऱ्यांवरील वॉटर स्पोर्ट्स बंद केल्याने स्थानिक लोकांच्या रोजगारावर गदा आली आहे. वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना न आल्यामुळे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने सुरू असलेले वॉटर स्पोर्ट्स त्वरित बंद केले आहेत.मुरुड तालुक्यातील काशीद, मुरुड तर अलिबाग तालुक्यातील किहीम अलिबाग, नागाव, श्रीवर्धन तालुका अशा अनेक स्थानिक लोकांचे वॉटर स्पोर्ट्स बंद झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. खूप दिवसांनी पर्यटक समुद्रकिनारी आले आहेत. त्यांना मजा करण्यासाठीच वॉटर स्पोर्ट्स आवश्यक असताना ते बंद करून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे काय साध्य होणार आहे, असा स्थानिक विचारत आहेत.रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी पर्यटकांच्या सोयीसाठी १५० पेक्षा जास्त वॉटर स्पोर्ट्स आहेत. यामध्ये बनाना रायडिंग, बोटीने समुद्रातून पर्यटकांना राउंड मारणे, स्पीड बोटीच्या साह्याने पॅरासिलिंग करणे असे विविध खेळ असून या सर्वांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यातील अनेक लोकांनी बँकेचे कर्ज घेऊन स्पीड बोटी विकत घेतल्या आहेत. या सर्वांना बँकेचे हप्ते कसे भरावयाचे, हा प्रश्न पडला आहे.कोरोना काळात संचारबंदीनंतर कुठे पर्यटक येथे यावयास लागले तर स्थानिकांचे व्यवसाय बंद केल्याने बेरोजगारीमुळे स्थानिक लोक संतापले असून वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याची जोरदार मागणी करीत आहेत.महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी मी याबाबत प्रत्यक्ष बोललो आहे. लवकरात लवकर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येत आहेत. यासाठी रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे हेसुद्धा प्रयत्न करीत आहेत. मेरिटाइम बोर्डाची गाइडलाइन येईल तेव्हा येईल वॉटर स्पोर्ट्स सुरू ठेवण्यात यावेत, असे मी सर्वांना आवाहन करीत आहे.- महेंद्र दळवी, आमदारस्पीड बोटीची किंमत २० ते २५ लाख रुपये असते. सर्वांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे. मागील काही महिन्यांपासून वॉटर स्पोर्ट्स बंद होते. त्यामुळे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावयाची, हा मोठा प्रश्न आहे.- सागर चौलकर, वॉटर स्पोर्टबोटीचे मालक
वॉटर स्पोर्ट्स बंद झाल्याने स्थानिकांचा रोजगार बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 1:04 AM